तरुण व ज्येष्ठ नागरिकांचा नेत्रदानाचा संकल्प
गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागाच्या वतीने जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त नेत्रदान चळवळीची जनजागृती करुन, गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयात परिसरात राबविण्यात आलेल्या उपक्रमात युवक व ज्येष्ठ नागरिकांनी उस्फुर्तपणे नेत्रदानाचे संकल्प अर्ज भरले.
मरावे परी नेत्र रुपी उरावे… हा संदेश देत राबविण्यात आलेल्या कार्यक्रमास अहमदनगर जिल्हा नेत्र विभाग प्रमुख नेत्रशल्य चिकित्सक डॉ.संतोष रासकर, डॉ. साजिद तांबोळी, डॉ. अजिता गरुड, डॉ.भूषण अनभुले, जिल्हा नेत्रदान समुपदेशक सतीश अहिरे, नेत्रचिकित्सा अधिकारी संतोष चौधरी, विवेक दिक्षित, मधुकर जत्ती, मंगेश वाचकवडे, पूजा राठोड आदी उपस्थित होते.
डॉ. संतोष रासकर म्हणाले की, मानवाला निसर्गाने दिलेली अनमोल ठेव म्हणजे डोळा असून, डोळ्याने जीवनाचा खरा आनंद घेता येतो. डोळ्यांशिवाय जगणे अशक्य असून, यासाठी डोळ्यांची निगा राखणे आवश्यक आहे. रोज मरणार्यांपैकी एका व्यक्तीचे डोळे दान केल्यास जवळपास सर्वच अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होणार आहे. फक्त नेत्रदान संकल्प फॉर्म भरून नव्हे, तर प्रत्यक्ष मृत्यूनंतर जवळच्या नेत्र पेढीमध्ये नेत्रदान झाल्यास खर्या अर्थाने दृष्टीदान दिवस साजरा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हा नेत्रदान समुपदेशक सतीश अहिरे यांनी भारताच्या लोकसंख्येपैकी तीस टक्के अंध व्यक्ती आहेत. दरवर्षी भारतात 75 हजार ते 1लाख नेत्रबुब्बळांची गरज भासते. महाराष्ट्रात दरवर्षी 35 हजार रुग्णांना डोळ्यांची आवश्यकता आहे.मात्र महाराष्ट्रात फक्त सहा ते आठ हजार नेत्रबुब्बुळे उपलब्ध होतात, एप्रिल 2021 ते मे 2022 पर्यंत जिल्हा रुग्णालय व जिल्ह्यातील नेत्र पेंढ्याच्या सहकार्याने नेत्रदान चळवळीच्या माध्यमातून 127 नेत्रबुब्बळांचे संकलन केले आहे. तर 72 नेत्ररोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या, असल्याची माहिती देऊन त्यांनी नेत्रदान कसे कोठे?करावे? यांसह नेत्रदानबद्दलची सविस्तर माहिती दिली.
यावेळी आलेल्या रुग्णांची नेत्रतपासणी करुन मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर रुग्णांना मोफत डोळ्यांचे ड्रॉप्स, चष्मा, औषधेही देण्यात आले. जिल्हा रुग्णालयाच्या नेत्र विभागात गरजूंवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जात असून, याचा लाभ घेण्याचे व मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक दिक्षित यांनी केले. आभार संतोष चौधरी यांनी मानले. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांचे मार्गदर्शन लाभले.