आठ ते दहा वर्षानंतरही कर्मचारी कायम न झाल्याने कोणत्या संचालकांना किती पैसे दिल्याची? चर्चा रंगली
सध्या भरतीसाठी प्रत्येक संचालकांना दिलेल्या पाच उमेदवारांच्या कोट्यावर पाणी फिरण्याची चिन्हे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा बँकेत ऑफलाईन पद्धतीने होणार्या नोकरभरतीत हस्तक्षेप व गैरव्यवहार टाळण्यासाठी जिल्हा सहकारी बँकांमधील नोकर भरती ऑनलाईन घेण्याच्या सूचना शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या सहकारी संस्थांचे सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी दिले असून, या निर्णयाने संचालक व भरतीमध्ये हस्तक्षेप करणार्यांना एकप्रकारे लगाम लागणार आहे. अहमदनगर जिल्हा बँकेत अनेक संचालकांनी यापूर्वी हस्तक्षेप करुन अनेक उमेदवारांना बँकेत नोकर्या मिळवून दिल्या, मात्र आठ ते दहा वर्षानंतरही ते कर्मचारी कायम झाले नसल्याने त्यांनी कोणत्या संचालकांना किती पैसे दिल्याची? चर्चा रंगली आहे. तर सध्या भरतीसाठी प्रत्येक संचालकांना पाच उमेदवारांचा कोटा मिळाला असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा बँकेत यापूर्वी वेगवेगळ्या वर्षात सुमारे तीनशे उमेदवार कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेण्यात आले होते. याभरतीत काही संचालकांनी उमेदवारांकडून आर्थिक देवाण-घेवाण करुन बँकेत कायम नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देऊन कॉन्ट्रॅक्ट बेसवर नोकरी मिळवून दिली. यामधील कर्मचार्यांना सुमारे आठ ते दहा वर्ष होत आली आहे. तरीदेखील ते अद्यापि कायम झालेले नसून, आर्थिक हित साधण्यासाठी काही संचालकांनी उमेदवारांच्या डोळ्यात धुळफेक करुन त्यांना बँकेत कायम नोकरी देण्याचे गाजर दाखविले आहे.
सध्या सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नूसार जिल्हा बँकेत पुन्हा नोकर भरतीसाठी मलिदा लाटण्याकरिता प्रत्येक संचालकांना 5 उमेदवारांचा कोटा देण्यात आलेल आहे. मात्र हे उमेदवार कॉन्ट्रॅक्ट बेसवरच राहणार असून, त्यांना कायम करण्याचे पुन्हा गाजर दाखविण्यात येणार आहे. जिल्हा सहकारी बँकांमधील नोकर भरती ऑनलाईन घेण्याच्या निर्णयाने या संचालकांच्या मनसुभ्यावर पाणी फिरण्याची शक्यता आहे.
नुकतेच 23 जून रोजी जिल्हा बँकेत ऑफलाईन पद्धतीने नोकर भरती करण्यासाठी शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. यामध्ये ऑनलाईन भरतीसाठी अधिकृत संस्थांची व एजन्सी यांची राज्यस्तरीय तालिका व पॅनल सहकार आयुक्त व निबंधकांनी तयार करावे लागणार आहे. राज्य सहकारी बँक असोसिएशन व इंडियन बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) यांसारख्या यंत्रणांचा समावेश भरती प्रक्रियेत राहणार आहे. यामुळे संचालकांना भरती प्रक्रियेमध्ये ढवळाढवळ करता येणार नाही.
सुशिक्षित बेरोजगार मुलांच्या लग्नासाठी जिल्हा बँकेच्या नोकरीचा स्टेटस
अनेक सुशिक्षित बेरोजगार मुलांनी संचालकांच्या नोकरीवर कायम करण्याच्या भूलथापांना बळी पडून, लाखो रुपये देऊन कॉन्ट्रॅक्ट बेसवरची नोकरी मिळवली. जिल्हा बँकेत मुलगा नोकरीला असल्याने अनेकांचे लग्न झाले. काहींनी तर मुलीच्या वडिलांकडून हुंडा घेऊन नोकरीसाठी भरलेले पैसे एकप्रकारे वसूल केले. मात्र अनेक वर्ष उलटून देखील जावई अल्प पगारावर असल्याने मुलींच्या आई-वडिलांची फसगत झाली. मात्र मुलांच्या लग्नासाठी जिल्हा बँकेच्या नोकरीचा स्टेटस कामाला आला.
सध्या जिल्हा बँकेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर नोकर भरती सुरु असून, ते कर्मचारी कधीही कायम होऊ शकणार नाही. अशा उमेदवारांनी कोणत्याही संचालकांच्या भूलथापांना बळी पडू नये. शासनाच्या ऑनलाईन नोकर भरतीच्या निर्णयाने असे प्रकार म्हणजे फक्त फसवणुक ठरणार आहे.