दृष्टीदोष असलेल्या दीनदुबळ्यांचे जीवन फिनिक्सने प्रकाशमान केले -प्रा. शशीकांत गाडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- दृष्टीदोष असलेल्या दीनदुबळ्यांचे जीवन फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी प्रकाशमान केले. अविरतपणे नेत्र शिबीर घेऊन ते दीनदुबळ्यांची सेवा करत आहे. त्यांची निस्वार्थ रुग्णसेवा प्रेरणादायी असून, त्यांनी मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेऊन लाखो दुर्बल घटकांना नवदृष्टी देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशीकांत गाडे यांनी केले.
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीच्या वतीने नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा नागरदेवळे गटाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गाडे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन अनिल झोडगे, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, तालुकाध्यक्ष राजेंद्र भगत, अल्पसंख्यांक सेलचे मज्जू शेख, युवा नेते महेश झोडगे, माजी उपसरपंच रतन जाधव, अण्णा चौधरी, सोमनाथ रानमळकर आदी उपस्थित होते.
दिलीप सातपुते यांनी फिनिक्स फाऊंडेशनने गरजू घटकांना नेत्र शिबीराच्या माध्यमातून आधार देताना कोरोना काळातही न घाबरता पोहचवलेली मदत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. शरद झोडगे म्हणाले की, सर्वसामान्य घटकातील ज्येष्ठ नागरिकांना दृष्टी देण्याचे कार्य फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून अविरत सुरु आहे. वंचितांच्या आरोग्यसेवेसाठी सदैव तत्पर असणारे बोरुडे समाजाचे भूषण असून, त्यांनी नागरदेवळे गावाचे नांव राज्यात उंचावले असल्याचे त्यांनी सांगितले. जालिंदर बोरुडे यांनी निस्वार्थ भावनेने फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने कार्य सुरु आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान चळवळीतही कार्य सुरु आहे. फाऊंडेशनने केलेल्या आवहानाला प्रतिसाद देत होत असलेले नेत्रदान हे पुरस्कारापेक्षाही मोठे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.