• Wed. Dec 11th, 2024

जायंट्स ग्रुप व अजय फाऊंडेशनच्या वतीने
कर्करोग जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ
जागतिक कर्करोग निवारण दिनाचा उपक्रम
कर्करोग रोखण्यासाठी व रुग्णांना नवजीवन देण्याचे कार्य करणार्‍या डॉक्टरचा सत्कार

ByMirror

Feb 6, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंट्स ग्रुप व अजय फाऊंडेशनच्या वतीने जागतिक कर्करोग (कॅन्सर) निवारण दिनानिमित्त निमित्त कर्करोग (कॅन्सर) जनजागृतीच्या सप्ताहाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या अभियानांतर्गत शहरात कॅन्सर रोखण्यासाठी व रुग्णांना नवजीवन देण्याचे कार्य करणारे डॉ. सतीश सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशनचे सदस्य संजय गुगळे, जायंट्स ग्रुपच्या अध्यक्षा विद्या तन्वर, केमिस्ट संघटनेचे माजी अध्यक्ष सुधीर लांडगे, आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, उद्योजक प्रकाश कटारिया, गणेश भुस्सा आदी उपस्थित होते.


जायंट्स ग्रुपच्या अध्यक्षा विद्या तन्वर यांनी पतीचे निधन कॅन्सरने झाल्याने त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ अविरतपणे कॅन्सरची जनजागृती सुरु असल्याची माहिती दिली. जायंट्स वेल्फेअरचे सदस्य संजय गुगळे यांनी कॅन्सर रोगामुळे भारतात अनेकांचा बळी जात आहे. वेळेवर निदान व उपचार न झाल्याने बरा होणारा कॅन्सर जीवघेणा बनला आहे. रुग्णांनी वेळोवेळी तपासणी करुन उपचार घेणे आवश्यक आहे. जायंट्सच्या माध्यमातून कॅन्सरबद्दल जनजागृती सप्ताहाच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे सांगून, जायंट्स ग्रुपच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. जनकल्याण रक्तपिढीच्या संचालकपदी सुधीर लांडगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच कॅन्सर जनजागृतीवर डॉ. सोनवणे लिखित पुस्तके वाटण्यात आली.
डॉ. सतीश सोनवणे म्हणाले की, वेळेत उपचार व निदान झाल्यास कॅन्सर बरा होतो. ज्याच्या नावाने हृदयात धडकी भरते असा रोग म्हणजे कॅन्सर, हा असाध्य रोग अशी एक गैरसमजूत आहे. कॅन्सरचे योग्य वेळी निदान व उपचार कॅन्सर तज्ञांकडून केले तर कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. कॅन्सरची अनेक कारणे आहेत. साधारणत: 40 टक्के कर्करोग हे तंबाखूसेवनाशी निगडीत आहेत. कॅन्सरची चाहूल ही शरीरात कोणत्याही भागात अचानकपणे आलेली गाठ, विशेषत: स्तनात व मानेमध्ये आलेली गाठ, हळूहळू वाढणारी औषधाने बरी न होणारी जखम किंवा कातडी, ओठ, तोंड व जीभ इत्यादी ठिकाणी झालेली जखम, औषधाला दाद न देणारा खोकला किंवा घशात घोगरा आवाज, अगर आवाजात पडलेला फरक या गोष्टींमुळे प्राथमिक अवस्थेत कॅन्सर ओळखता येतो. रुग्णांवर शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपी, स्क्रीनिंगद्वारे निदान व उपचार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *