फिनिक्सच्या नेत्र चळवळीने अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला -डॉ. रविंद्र ठाकूर
79 गरजू रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्सच्या नेत्र चळवळीने अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला. समाजाची गरज ओळखून फिनिक्सने उभे केलेले सामाजिक कार्य प्रेरणा देणारे आहे. वंचितांचे नेत्रदूत म्हणून फिनिक्स फाऊंडेशन योगदान देत असून, दर महिन्याला गरजूंसाठी होणारे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रविंद्र ठाकूर यांनी केले.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आयोजित मोफत नेत्र, तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी ठाकूर बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके, फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, जिल्हा बँकेचे वाघमारे, ह.भ.प. खेसे महाराज, राजेंद्र बोरुडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून दृष्टीदोष असलेल्या वंचित घटकातील रुग्णांची मागील 29 वर्षापासून सेवा सुरु आहे. नेत्रदान व अवयवदान चळवळीत देखील योगदान देण्यात आले आहे. अनेक दृष्टीहीनांना नेत्रदानाच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेचे वाघमारे यांनी ग्रामीण भागाशी नाळ जोडून फिनिक्स फाऊंडेशन कार्य करत असल्याचे स्पष्ट केले. खेसे महाराज यांनी दीनदुबळ्यांची सेवा करुन वारकरी संप्रदायाचा वारसा जपण्याचे कार्य फिनिक्स फाउंडेशन आपल्या कार्यातून करत असल्याचे सांगितले.
सुधीर लंके म्हणाले की, ग्रामीण भागात नेत्रदान चळवळ जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून रुजवली. संत सावता महाराजांनी कर्मकांड न करता चांगले कर्म करण्याचा उपदेश केला. त्यांच्या विचाराने समाजातील दृष्टीहीनांना नवदृष्टी देण्याचे पवित्र कार्य म्हणजे विठ्ठलाचे कार्य सुरू आहे. सावता महाराजांच्या विचाराने ही चळवळ सुरु आहे. नेत्रदान केल्यास समाजातील अंधंना जग पाहता येणार आहे. शरीराच्या डोळ्यांसह विचारांची दृष्टी देखील महत्त्वाची आहे. दूरदृष्टी ठेवून चालवलेली ही सामाजिक चळवळ दिशा देणारी असल्याचे त्यांनी सांगितले.
गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबीरात 392 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. 79 गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिकांची मधुमेह व उच्च रक्तदाबची तपासणी करण्यात आली. तर अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन कुर्हे यांनी केले. आभार राजेंद्र बोरुडे यांनी मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी ओम बोरुडे, जय बोरुडे, जगदीश बोरुडे, गौरव बोरुडे, सौरभ बोरुडे, वसंत कापरे, विशाल गायके यांनी परिश्रम घेतले.