• Wed. Dec 11th, 2024

जय हिंद फाउंडेशनने बाबुर्डीला लावली 51 वडाची झाडे

ByMirror

Jul 16, 2022

पर्यावरणावर शाश्‍वत विकास अवलंबून -भास्करराव पेरे पाटील

माजी सैनिकांचा पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार

अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरणावर शाश्‍वत विकास अवलंबून आहे. मनुष्याच्या हस्तक्षेपाने पर्यावरणाचे नुकसान होऊन निसर्गाचे चक्र बिघडल्यास त्याचे नुकसान भरुन निघणार नाही. याचे दुष्परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीला भोगावे लागणार आहे. निसर्गाने मनुष्याला भरभरुन दिले. मात्र अधिकच्या हव्यासापोटी मनुष्याने निसर्गाचे नुकसान केले. निसर्गाची परतफेड वृक्षरोपणाने करण्याची वेळ आली असून, यामुळे पर्यावरण संवर्धन देखील होणार असल्याचे प्रतिपादन आदर्शगाव पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.


जय हिंद फाउंडेशनच्या वतीने बाबुर्डी (ता. पारनेर) गावात वृक्षरोपण अभियान राबवून 51 वडाच्या झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी पेरे पाटील बोलत होते. फाऊंडेशनने संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षरोपण मोहिम हाती घेतली असून, या उपक्रमातंर्गत ही झाडे लावण्यात आली. यावेळी जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, संतोष दिवटे, संदीप गट, सरपंच प्रकाश गुंड, ग्रामसेवक संदीप बळीद, उपसरपंच रवींद्र गवळी, कृषी अधिकारी रणदिवे, अमृत कदम, किशोर लगड, बाबासाहेब गवळी, किसन ठुबे, नारायण घाडगे, अशोक दिवटे, तुकाराम जगताप, रमेश गवळी, वामन बारवकर, गणेश दिवटे, सोपान गायकवाड, आकाश पिंपळे, श्याम लगड, अर्जुन जगताप, भाऊसाहेब गवळी, आकाश पिंपळे, विमल गारकर, पुष्पा गवळी आदींसह माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे पेरे पाटील म्हणाले की, जय हिंद फाऊंडेशनने पर्यावरण संवर्धनासाठी उचललेले पाऊल दिशादर्शक आहे. माजी सैनिकांची पर्यावरणाप्रती असलेली आस्था व प्रेम पाहून भारावलो असल्याचे त्यांनी सांगितले.


शिवाजी पालवे म्हणाले की, जय हिंद फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील डोंगर, टेकड्या, गड, मंदिर परिसरात निसर्ग फुलवायचं काम केले जात आहे. देश सेवा केल्यानंतर माजी सैनिक पर्यावरण संवर्धनासाठी क्रांतिकारी वृक्ष चळवळ उभी केली असल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच प्रकाश गुंड यांनी लावण्यात आलेल्या झाडांचे संवर्धन बाबुर्डी ग्रामपंचायतच्या वतीने केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. आभार संतोष दिवटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *