प्रशिक्षणार्थी महिला व युवतींशी साधला संवाद
अहमदनगर(प्रतिनिधी)- कुटुंबा पुरते मर्यादित न राहता समाजात योगदान देण्यासाठी महिलांनी पुढे यावे. स्त्री सर्व कर्तव्य बजावून कुटुंब सांभाळत असते. कुटुंबाप्रमाणे समाजाचे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी प्रत्येक महिलेने घेतल्यास बदल निश्चित होणार आहे. स्वतःचा विकास साधण्यासाठी महिलांनी शिक्षण व व्यवसायिक प्रशिक्षण घेण्याचे आवाहन उमा गौरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा डॉ. दिपाली पानसरे यांनी केले.
कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय (नवी दिल्ली) अंतर्गत नालेगाव येथील जन शिक्षण संस्थेत सुरु असलेल्या महिलांच्या व्यावसायिक प्रशिक्षण वर्गास डॉ. पानसरे यांनी भेट दिली. यावेळी महिलांचे सुरु असलेल्या विविध व्यावसायिक प्रशिक्षणाची पहाणी करुन त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी जनशिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य कमल पवार, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे, अनिल तांदळे, प्रियंका वाळके, प्रदिप गुंजाळ, प्रियंका साळवे, माधुरी घाटविसावे, मंगल चौधरी आदींसह प्रशिक्षिका व महिला उपस्थित होत्या.
पुढे डॉ. पानसरे म्हणाल्या की, कुटुंबाचे आरोग्य सांभाळताना स्वतःच्या आरोग्यावर देखील लक्ष द्यावे. जीभेसाठी न खाता शरीरासाठी खावे. शरीरस्वास्थ्य ठेवण्यासाठी आहार आणि व्यायामाकडे लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात बाळासाहेब पवार म्हणाले की, जनशिक्षण संस्था सन 2005 पासून व्यवसायिक प्रशिक्षण देऊन महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम करत आहे. संस्थेच्या वतीने वर्षभर विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात असून, अनेक महिला व युवतींनी प्रशिक्षण घेऊन स्वत:चे विविध व्यवसाय उभे केले आहे. संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य सुरू असून, काळानुरुप महिलांना अद्यावत प्रशिक्षण देण्यासाठी ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग आदी व्यावसायिक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत कमल पवार व अनिल तांदळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदा शिंदे यांनी केले. आभार शफाकत सय्यद यांनी मानले.