फॅशनच्या दुनियेत उंच भरारी घेताना युवतींनी संस्काराची जोड असू द्यावी -शितल जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- फॅशनच्या दुनियेत उंच भरारी घेताना युवतींनी संस्काराची जोड असू द्यावी. ज्येष्ठांचा सन्मान राखला गेला पाहिजे. पुरुष हा घरातील कर्ता असला, तरी कुटुंब घडवणारी ही स्त्री असते हे विसरून चालणार नसल्याचे प्रतिपादन नगरसेविका शितल जगताप यांनी केले.
कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय संचलित जन शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेविका जगताप बोलत होत्या. सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी नगरसेविका दिपाली बारस्कर, तृतीयपंथी संघटनेच्या राज्याध्यक्ष काजल गुरु, जनशिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, कमल पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे शितल जगताप म्हणाल्या की, महिलांचा सन्मान झाल्याने आणखी जबाबदारी वाढली आहे. कुटुंबामध्ये महिला व्यस्त असल्याने त्यांच्या कलागुणांना वाव मिळत नाही. कुटुंबाची जबाबदारी सांभाळून इतर गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो. कुटुंबाला बरोबर घेऊन महिला पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात बाळासाहेब पवार म्हणाले की, दरवर्षी महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात येतो. मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून कार्यक्रम झाला नसल्याने या वर्षी उत्साह अधिक आहे. 2005 पासून जन शिक्षण संस्था कार्यरत असून, वर्षभर महिलांसाठी विविध कार्यक्रम, उपक्रम राबवित असते. संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य सुरू असून, आत्मनिर्भर भारत घडविण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरसेविका दिपाली बारस्कर म्हणाल्या की, महिलांच्या हक्काचा हा एक दिवस असून, या दिवशी महिलांना हक्क मिळाले. चूल व मूल पलीकडे जाऊन महिलांनी सर्व क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. महिलांनी आपल्या सुप्तकलागुणांना वाव देण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे. यामुळे जीवनात एक वेगळा आनंद निर्माण होतो. मुलींना बंधनात ठेवण्याऐवजी मुलांना परस्त्रीचा सन्मान राखण्याचे संस्कार रुजवणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अबला तू राहिली नाही, सबला तूला होऊ देत नाही!… ती कविता सादर करून स्त्रियांचे प्रश्न मांडले. काजल गुरु यांनी जीवनात मनुष्याला एक स्त्री घडवत असते, नारी ही मोठी शक्ती असून, तिचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
कोरोनाकाळात महिलांना गावो-गावी आणि वाडी वस्तीवर जाऊन मास्क, सॅनिटायझर, फिनेल, हॅन्डवॉश बनविण्याचे प्रशिक्षण दिल्याबद्दल तसेच अनेक महिलांना सक्षम करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देत असल्याबद्दल कमल पवार व ममता गड्डम या महिलांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच युवतींना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देणार्या महिला प्रशिक्षिकांचा सत्कार करुन प्रशिक्षण पुर्ण केलेल्या युवतींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. शुभदा दळवी या विद्यार्थिनीने शिवाजी महाराजांवर सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. श्रध्दा बर्वे या मुलीने स्त्री जन्माचे स्वागत या विषयावर भावनिक मनोगत व्यक्त केले. तर रोशनी कलगुंदे यांनी जन शिक्षण संस्थेबद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या कार्यक्रम सहअधिकारी कुंदा शिंदे यांनी केले. आभार कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद व अनिल तांदळे यांनी मानले. यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.