आंतराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालयाच्या (नवी दिल्ली) नालेगाव येथील जन शिक्षण संस्थेच्या वतीने आंतराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मार्कंडेय संकुलात झालेल्या योग कार्यक्रमात युवतींसह महिलांनी सहभाग नोंदवून योग व प्राणायामाचे धडे गिरवले.
मानवतेसाठी योग ही केंद्र सरकारची थीम घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये समृध्द योगाच्या योग शिक्षिका सुजाता यश पाटील यांनी योग व प्राणायामाचे महत्त्व सांगून उपस्थित युवती व महिलांकडून योगाचे आसने प्रात्यक्षिकासह करुन घेतली. अनेक गृहिणींनी कंबरेला पदर खोचून योगांची विविध आसने केली.
यावेळी जनशिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य कमल पवार, योग शिक्षक तथा निसर्गोपचार तज्ञ डॉ. यशवंतराव पाटील, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे, अनिल तांदळे, माधुरी घाटविसावे, मंगल चौधरी, सुरेखा कोडम आदींसह प्रशिक्षिका व महिला उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात बाळासाहेब पवार यांनी जनशिक्षण संस्था सन 2005 पासून महिला व युवतींना व्यवसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना पायावर उभे करण्याचे काम करत आहे. संस्थेच्या वतीने वर्षभर विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात असून, अनेक महिला व युवतींनी प्रशिक्षण घेऊन स्वत:चे विविध व्यवसाय उभे केले आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. यशवंतराव पाटील यांनी युवा पिढी मोबाईलमध्ये गुंतल्याने त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना वाढली आहे. त्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी योग व प्राणायाम काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले. अत्यंत सोप्या पध्दतीने योग व प्राणायाम शिकवल्याबद्दल संस्थेच्या वतीने योग शिक्षिका सुजाता पाटील यांचा सत्कार करण्यात आला.