सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून व बाजार समित्यांमध्ये शेतकर्यांना मतदान अधिकाराच्या निर्णयाचे स्वागत
पेट्रोल व डिझेल स्वस्त केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेतून होण्यासाठी व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकर्यांना मतदानाचा अधिकार दिलेल्या निर्णयाचे स्वागत करुन, पेट्रोल व डिझेल स्वस्त केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानले आहे.
राज्यात ग्रामीण भागाचा विकास व लोकहित लक्षात घेऊन गटातटाचे, भावकीचे आणि जातीयवादाचे राजकारण संपविण्यासाठी पुन्हा थेट जनतेतूनच सरपंचाची निवड होण्यासाठी नवीन सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तसेच जनहितासाठी नवीन सरकारकडून धडाकेबाज निर्णय घेतले जात असल्याने सर्वसामान्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकर्यांना मतदानाचा अधिकार दिल्याने शेतकर्यांना न्याय मिळू शकणार आहे. शेतकर्यांच्या हितासाठी काम करणारे संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडून येण्यास मदत होणार आहे. एकंदर नवीन सरकारने घोडेबाजारला लगाम लावून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले असल्याचे भालसिंग यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.
सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेतून झाल्यास सर्वसामान्य कष्टाळू व प्रामाणिक नेतृत्व उदयास येतील. राजकारणातील घराणेशाही व घोडेबाजार थांबून काम करणार्यांना संधी मिळणार आहे. पेट्रोल व डिझेलच्या भाव वाढीने महागाई गगनाला भिडली आहे. राज्यात पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त केल्याने याचा परिणाम वाढलेली महागाई कमी होण्यास मदत होणार आहे. सर्वसामान्यांचे हित पाहून सरकार कार्य करत असल्याचे भालसिंग यांनी म्हंटले आहे.