रविवारी रमजानचा पहिला रोजा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शनिवारी संध्याकाळी शहरात (दि.2 एप्रिल) चंद्रदर्शन झाल्याने मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली असून, रविवारी पहिला उपवास असणार आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून मुस्लिम बांधवांना साध्या पध्दतीने ईद साजरी करावी लागली. मात्र सध्या शासनाने कोरोनाचे निर्बंधात मोठ्या प्रमाणात सुट दिल्याने यावर्षीचा रमजान महिना मुस्लिम बांधवांना मोठ्या उत्साहात व मशिदीत ईबादत करुन साजरा करता येणार आहे.
शनिवारी चंद्रदर्शन होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान प्रारंभच्या शुभेच्छा दिल्या. या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव अल्लाहच्या उपासनेमध्ये व्यस्त असतात. पहाटे सुर्योद्यापुर्वी सहेरी करुन उपवास धरला जातो. तर संध्याकाळी सुर्यास्तावेळी इफ्तार करुन उपवास सोडला जातो. यामध्ये संपुर्ण दिवसभर पाणी, अन्न काही घेतले जात नाही. घरोघरी कुरान पठण करुन मिस्लिम बांधव पाच वेळची नमाज अदा करत असतात. रात्री तराहवीची नमाज अदा केली जाते. ज्या मध्ये कुरानच्या पारेचा समावेश असतो. नमाजनंतर मशिदमध्ये जे पठण झाले त्याचा अर्थ देखील मौलाना विशद करत असतात. शांतता, प्रेम, बंधुभाव, त्याग व उपासनेचा प्रतिक असलेल्या रमजान महिना सुरु झाल्याने सर्व समाजबांधवांनी एकमेकांना चांद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या.