बालभवन व वसतीगृहातील तेराशे विद्यार्थ्यांना चायनीज फुड पॅकेट वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत शहरात सुरु झालेल्या व कोणत्याही संकटात सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणार्या घर घर लंगर सेवेच्या दोन वर्षपुर्तीनिमित्त शहरातील बालभवन व वसतीगृहातील तेराशे विद्यार्थ्यांसाठी चायनीज फुड पॅकेट वाटप व कोरोनाचे संकट कायमचे जाण्यासाठी सर्वधर्मिय धर्म गुरुंच्या उपस्थितीमध्ये प्रार्थनेचा कार्यक्रम घेण्यात आला.
प्रेमदान चौकातील कॅफे कोनो येथे विद्यार्थ्यांसाठी मंचुरीयन व न्युडल्स हे चायनीज खाद्य बनवून त्याचे वाटप सेवादारांच्या माध्यमातून करण्यात आले. गुरुद्वार्याचे बाबाजी कर्निलसिंग मांगट, राधाकृष्ण मंदिरचे पंडित महेंद्र शर्मा, तारकपूर चर्चचे पास्टर योसेफ वैरागर, सिस्टर पवार व मौलाना अक्रम यांनी प्रार्थना करुन लंगर सेवेत योगदान देणार्यांना आशिर्वादीत करुन, कोरोनाचे संकट कायमचे दूर होण्याची प्रार्थना केली. यावेळी आमदार संग्राम जगताप, श्रीरामपूरचे विभागीय पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, उपमहापौर गणेश भोसले, परिमल निकम, पृथ्वी गुलाटी, सुरेश शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मागील दोन वर्षापासून घर घर लंगरसेवा निस्वार्थ भावनेने दुर्बल घटकांना आधार देत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून माणुसकीच्या भावनेने अविरतपणे गरजूंना अन्नदान करण्यात आले. ही सेवा फक्त अन्ना पुरती मर्यादीत न ठेवता जेथे गरज लागेल तेथे लंगर सेवेचे सेवादार देवदूत प्रमाणे उभे राहिले. जनावरांच्या चार्याचा प्रश्न असो की, कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन. प्रत्येक संकटांना तोंड देऊन वंचित घटकांना जगण्याची उमेद लंगर सेवेने दिली. रशिया-युक्रेनच्या युध्दातही पंजाबी समाजाची लंगर सेवा पहावयास मिळत आहे. शहरातील लाखोंची भूक भागवून अनेक गरजूंना आधार देत हजारो कोरोना रुग्णांना जीवन देण्याचे कार्य लंगर सेवेने केले असल्याचे त्यांनी सांगितले.
घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा म्हणाले की, मागील दोन वर्षापुर्वी सुरु झालेल्या लंगर सेवेने संकट कोरोना महामारीचे असो किंवा महापुरचे संकटात सापडलेल्या प्रत्येकाला मदतीचा हात देण्यात आला आहे. टाळेबंदीत अनेक कामगार, गरजू घटकांसह कोविड सेंटर व रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे जेवण पुरविण्यात आले. ही सेवा आजतागायत हॉस्पिटलमध्ये गरजूंना जेवण पुरवून सुरु आहे. या बरोबर ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जुने स्मार्ट फोन, लॅपटॉप पुरविण्यात आले. मनुष्याला जेवणाने तृप्त करत असताना जनावरांसाठी देखील चारा वाटपाचे काम करण्यात आले. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असताना ऑक्सिजन सिलेंडरची निशुल्क सेवा पुरवली. तसेच महापालिकेच्या सहकार्याने हॉटेल नटराज व जैन पितळे वसतीगृहात कोविड सेंटर चालविण्यात आले. या कोविड सेंटरच्या माध्यमातून हजारो रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. हॉटेल नटराज येथील कोविड सेंटर आजही सुरु आहे. कोरोनाच्या संकटाबरोबरच अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील काही भाग व राज्यातील पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन लंगर सेवेच्या माध्यमातून सेवा देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रितपालसिंह धुप्पड यांनी गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या कार्यात अहमदनगर महापालिका, पोलीस दल व लायन्स क्लबचे विशेष सहकार्य लाभल्याचे स्पष्ट केले. यावेळी लंगर सेवेचे राजेंद्र कंत्रोड, किशोर मुनोत, प्रशांत मुनोत, राहुल बजाज, मनोज मदान, अनिश आहुजा, गोविंद खुराणा, सुनिल थोरात, अर्जुन मदान, कैलाश नवलानी, दिपक मेहतानी, प्रमोद पंतम, शरद बेरड, पुरुषोत्तम बेट्टी, करण धुप्पड आदी सेवादार उपस्थित होते. आभार प्रशांत मुनोत यांनी मानले.