शहरात रात्री देखील मिळणार भूकेलेल्यांना जेवण
घर घर लंगर सेवेच्या दातृत्वाला सलाम -डॉ. बी.जी. शेखर पाटील
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात अनेक श्रीमंत माणसांकडे भरपूर पैसा असतो, पण देण्याची दानत नसते. दातृत्व हा श्रीमंताचा खरा दागिना असावा. दातृत्व असणारी व्यक्ती योगदान देऊन समाजातील वंचितांना आधार देण्याचे काम करत असतात. घर घर लंगर सेवेच्या सेवादारांनी आपल्या दातृत्वाने कोरोना काळात लाखो भूकेलेल्यांना दोन वेळचे जेवण दिले. पूर असो की, गरजू विद्यार्थ्यांचा प्रश्न प्रत्येक संकटात सर्वसामान्यांच्या मदतीला ते धावून आले असल्याचे स्पष्ट करुन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी घर घर लंगर सेवेच्या दातृत्वाला सलाम केला.
कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सुरु झालेल्या व तब्बल अडीच वर्ष भूकेलेल्यांना अविरतपणे जेवण पुरविणार्या घर घर लंगर सेवेच्या वतीने तारकपूर येथे अन्न छत्राच्या शुभारंभप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, ठाकूरशेठ नवलाणी, महेश मध्यान, सुभाष जग्गी, अमन वाही, घर घर लंगर सेवेचे जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, हरजितसिंह वधवा, दामोदर माखिजा, राहुल बजाज आदी उपस्थित होते.
पुढे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी शहराची गरज ओळखून लंगर सेवेने दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. या सेवा कार्यात त्यांनी पोलिसांना देखील सहभागी करून घेतले. अशा सामाजिक उपक्रमास पोलीस दलाचे नेहमीच पाठबळ राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मागील दोन ते अडीच वर्षापासून घर घर लंगरसेवा निस्वार्थ भावनेने दुर्बल घटकांना आधार देत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून माणुसकीच्या भावनेने अविरतपणे गरजूंना अन्नदान करण्यात आले. ही सेवा फक्त अन्ना पुरती मर्यादीत न ठेवता जेथे गरज लागेल तेथे लंगर सेवेचे सेवादार देवदूत प्रमाणे उभे राहिले. जनावरांच्या चार्यापासून ते कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन त्यांनी पुरवले. अनेक गरजूंना आधार देत कोविड सेंटरच्या माध्यमातून त्यांनी हजारो कोरोना रुग्णांना जीवन देण्याचे कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
हरजितसिंह वधवा यांनी लंगर सेवेच्या माध्यमातून अन्नाचे पाकिट गरजूंना पुरविण्याचे कार्य सुरु होते. मात्र तारकपूरला एक अन्न छत्र सुरु करण्यात आले असून, गरजूंना 10 रुपयामध्ये पोटभर जेवण देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. तारकपूर बस स्टॅण्ड, जिल्हा रुग्णालय व इतर विविध खासगी हॉस्पिटल या भागात असल्याने अनेकांना या अन्नछत्राचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या अन्न छत्रास माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी भेट देऊन पहाणी केली व लंगर सेवेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी लंगर सेवेचे किशोर कंत्रोड, बल्लू सचदेव, हरिश रंगलांनी, निपू धुप्पड, सुनील सहानी, राधेश्याम भाटिया, किशोर खुराणा, हरभजन धुप्पड, शीला तलवार, राजेश कंत्रोड, गुलशन कंत्रोड, शिशुपाल, करण धुप्पड, अजय पंजाबी, दामोदर माखिजा, अभिमन्यू नय्यर, अनिश आहुजा, सुनील छाजेड, दलजीतसिंह वधवा, गोविंद खुराणा, जय रंगलानी, कैलाश नवलानी, बलजीत बिलरा, प्रमोद पंतम, सुमित नवलानी, शरद बेरड, सागर पंजाबी, आशिष कुमार, संदेश रपारिया, राम बालानी, पुरुषोत्तम बेट्टी, सिमर वधवा, जस्मित वधवा, सुनील थोरात, मनोज मदान, सनी वधवा आदी उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय रितू अॅबट यांनी करुन दिला. आभार प्रशांत मुनोत यांनी मानले.
घर घर लंगर सेवा संचलित तारकपूर येथील अन्न छत्राद्वारे रात्री भूकेलेल्यांना मिळणार जेवण
शहरात शिवभोजन व इतर संस्थांच्या वतीने अल्पदरात भोजन देण्याची सोय आहे. मात्र रात्रीच्या जेवणासाठी गरजूंची मोठी परवड होत होती. ही गरज लक्षात घेऊन लंगर सेवेने अन्न छत्र सुरु केले असून, रात्री 7 ते 8:30 या वेळेत 10 रुपयात जेवण दिले जाणार आहे.
अन्न छत्रातून पहिले पार्सल पोलीस दलाच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यासाठी देण्यात आले. या मेळाव्यात आजी-माजी पोलिस, होमगार्ड यांचे मुले तसेच पारधी समाजातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी 9 वाजल्या पासून संध्याकाळ पर्यंत मुलाखती सुरु होत्या. अशा युवकांना लंगर सेवेच्या अन्न छत्रातून जेवण पुरविण्यात आले.