गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचा पुढाकार
भिमा गौतमी वस्तीगृहातील विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुप पर्यावरण, आरोग्यबरोबर वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी योगदान देत आहे. गरजू विद्यार्थ्यांना सहानुभूतीपेक्षा आधार देणे महत्त्वाचे असून, या ध्येय व उद्दीष्टाने हरदिन समाजात कार्य करत असल्याचे प्रतिपादन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी केले.
सामाजिक न्याय विभाग विशेष समाज कल्याण संचनालयाच्या भिमा गौतमी वस्तीगृहातील विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक साहित्य व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सपकाळ बोलत होते. कार्यक्रमासाठी ग्रुपचे रमेश वराडे, मेजर दिलीप ठोकळ, सचिन चोपडा, रमेश त्रिमुखे, दिपक बडदे, प्रफुल्ल मुळे, दिपक घोडके, अशोक पराते, केशव दवणे, सर्वेश सपकाळ, नगरसेवक किशोर (पिंटू) बोरा, अशोक लोंढे, अभिजीत सपकाळ, सिताराम परदेशी, सुर्यकांत कटोरे, मनोहर दरवडे, बापूसाहेब तांबे, कुमार धतुरे, एकनाथ जगताप, रवी भिंगारदिवे, संदीप यादव आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना सपकाळ म्हणाले की, गरजू विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार हरदिन मॉर्निंग ग्रुप त्यांना विविध स्वरुपात मदत देत आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे उज्वल भवितव्य असून, त्यांना घडविण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
किशोर बोरा म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजाचे उज्वल भवितव्य घडणार आहे. दुर्बल घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी हरदिन ग्रुपने उचललेले पाऊन दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. वस्तीगृहाच्या अधिक्षिका रजनी जाधव यांनी विद्यार्थिनींना आपल्या कुटुंबातील सदस्य समजून हरदिन मॉर्निंग ग्रुप करीत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. पाहुण्यांच्या हस्ते यावेळी वस्तीगृहातील 35 मुलींना स्कुल बॅग, दैनंदिन वैयक्तिक स्वच्छतेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.