आमदार संग्राम जगताप यांच्या आवहानाला प्रतिसाद देत अनेकांनी दिली मदत
पूरग्रस्तांसाठी एककोरोना महामारीचे संकट असो किंवा नैसर्गिक आपत्तीचे आमदार संग्राम जगताप सर्वसामान्यांच्या मदतीला नेहमीच धावून जातात -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीमुळे पुराने थैमान घातले असून, पुराचे संकट ओढवलेल्या गडचिरोलीच्या दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांना मदत पाठविण्यासाठी शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या आवहानाला प्रतिसाद देत, शहरासह उपनगर भागात एक हात मदतीचा या अभियानातंर्गत पूरग्रस्तांसाठी मदत संकलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने भिंगार शहरातून मदत संकलित करण्यात आली.
भिंगार वेस येथून मदत संकलनाला सुरुवात करण्यात आली. या अभियानात भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, मच्छिंद्र बेरड, बाळासाहेब राठोड, मारुती पवार, सुदाम गांधळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख, सर्वेश सपकाळ, युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, नाथाजी राऊत, सदाशिव मांढरे आदी उपस्थित होते.
चौका-चौकात जाऊन नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले. नागरिक, दुकानदार व व्यापार्यांनी उत्स्फुर्तपणे विविध प्रकारची मदत दिली. यामध्ये ब्लँकेट, कपडे, बिस्किटचे पुडे, अन्नाची पाकिटे, पाणीचे बॉक्स, औषधे, जीवनावश्यक वस्तू, धान्य, सॅनिटायझर्स, मास्क, जंतूनाशक औषधे, विविध साहित्याचा समावेश आहे. तर अनेकांनी रोख स्वरुपात पैश्याची मदत दिली. एक हात मदतीचा या अभियानाचे समन्वयक रोहन नलगे व श्रेयश लोंढे यांनी ही मदत स्विकारली व लवकरच ही मदत गडचिरोली येथील पूरग्रस्त भागात घेऊन जाण्यात येणार असल्याचे सांगितले.
संजय सपकाळ म्हणाले की, कोरोना महामारीचे संकट असो किंवा नैसर्गिक आपत्तीचे आमदार संग्राम जगताप सर्वसामान्यांच्या मदतीला धावून गेले आहेत. कोरोना महामारीत त्यांनी सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम केले. मागील वर्षी कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्तांसाठी देखील त्यांनी भरीव मदत शहरातून पाठवली होती. गडचिरोलीच्या दुर्गम भागात पुराने थैमान घातले असून, अनेक गावे पाण्याखाली गेली आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यांना मदतीची गरज असून, राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार जगताप यांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात दिला आहे. ही मदत पुरग्रस्त भागात जाऊन गरजवंतापर्यंत पोहच केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.