अहमदनगर (प्रतिनिधी)- मौजे खोसपुरी (ता. नगर) येथे शेतात दारू पिताना झालेल्या भांडणातून 36 वर्षे वयाच्या तरुणाचा दोघांनी शर्टने गळा आवळून खून केला व पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे 18 मे 2017 रोजी दाखल झाला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपींपैकी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली व दुसरा आरोपी हा फरार होता. फरार आरोपीचा जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेऊन, अॅड. सरिता एस. साबळे यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला.
अॅड. साबळे यांनी उच्च न्यायालयात सदर अर्जाचे कामे युक्तिवाद करून आरोपीची बाजू मांडली. आरोपीस अटक करण्याची कुठलीही आवश्यकता नाही. तसेच पोलिसांनी आरोपी यास नोटीस देऊन त्याचा जबाब या गुन्ह्यात नोंदविला होता. त्यानंतर त्याला अटक केली नव्हती, ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. सरकार पक्षातर्फे ओळख परेडसाठी आरोपीला अटक होणे गरजेचे असल्याची मागणी करण्यात आली. परंतु दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी संतोष उर्फ बापू सुदाम आवरे यास अटकपूर्व जामीनावर सुटका केली आहे.