शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या पाठपुराव्याला यश
अहमदनगर (प्रतिनिधी)- दहावी-बारावीच्या खेळाडूंना शासनाकडून 6 वी ते 12 वी मध्ये क्रीडा स्पर्धेत खेळला असल्यास सवलतीचे क्रीडा गुण दिले जातात. मात्र दहावी किंवा बारावीत असताना सहभागाची अट शासन निर्णयात आहे. मागील दोन वर्षात शालेय स्पर्धा न झाल्याने ही सहभागाची अट शिथिल करावी व खेळाडूंना सवलतीचे वाढीव गुण मिळावे म्हणून महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, अहमदनगर या संघटनेने केलेल्या मागणीचा विचार करून सहभागाची अट शिथिल करण्या संदर्भातील परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
20 डिसेंबर 2018 च्या शासन निर्णयाप्रमाणे 6 वी ते 12 वी मध्ये खेळला असेल तरी ग्रेस गुणांसाठी दहावी बारावीत असताना स्पर्धेत सहभागाची अट आहे. तसेच दहावीत असताना खेळाडूने सवलत घेतली असल्यास बारावीमध्ये सवलत घेण्यासाठी अकरावी बारावी मध्ये खेळात सहभाग अथवा प्राविण्य मिळविणे आवश्यक असते. मात्र मागील दोन वर्षात शालेय स्पर्धा झाल्या नाही. त्यामुळे गुण सवलत मिळेल की नाही या बाबत खेळाडू हवालदिल होते. महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाने क्रीडा आयुक्त, राज्य शिक्षण मंडळ, शिक्षण सचिव तथा शिक्षणमंत्री यांचेकडे या बाबत पाठपुरावा केला. अमरावती शारीरिक शिक्षण महामंडळाच्या वतीने शिक्षण राज्यमंत्री यांचे मार्फत ग्रेस गुणां संदर्भात पाठपुरावा केला होता.
शासनाने निर्गमित केलेल्या परिपत्रकान्वये सहभागाची दहावी, बारावीतील सहभागाची अट चालू वर्षी करीता शिथिल करून 10 वी साठी 7 वी – 8 वीतील क्रीडा स्पर्धेतील सहभाग, तर 12 वी साठी 9 वी – 10 वीत असताना क्रीडा स्पर्धेतील सहभाग लक्षात घेऊन 20 डिसेंबरच्या शासन निर्णयातील तरतुदी अनुरूप ग्रेस गुण देण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. शासन निर्णयातील अट शिथिल करून ग्रेस गुण मिळावे म्हणून शा.शि. व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, आनंद पवार, राजेश जाधव, विलास घोगरे, राजेंद्र पवार, राजेंद्र कदम, घनःशाम सानप, शिवदत्त ढवळे, ज्ञानेश काळे, प्रितम टेकाडे, कैलास माने, लक्ष्मण बेल्लाळे, मच्छिद्र ओव्हाळ आदींनी प्रयत्न केले.