निमगाव वाघा येथे महिला दिन साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथे कोरोना महामारीत अनेकांचे जीव वाचवून देवदूत ठरलेल्या महिला डॉक्टर व परिचारिकांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला. जिल्हा क्रीडा कार्यालय व नेहरु युवा केंद्र संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, नवनाथ विद्यालय आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात हा सन्मान सोहळा पार पडला. तसेच यावेळी शासनाचे पुरस्कार्थी व महिला खेळाडूंचा सत्कार करुन विद्यार्थ्यांसाठी महिलांच्या अनुषंगाने प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. आरोग्य उपकेंद्राच्या सलिमा शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, संगिता आतकर, कविता साळवे, रेखा गायकवाड, अलका कैतके, साहेबराव बोडखे, निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, दत्तात्रय जाधव, उत्तम कांडेकर, मंदाताई डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, तुकाराम खळदकर, लहानबा जाधव आदींसह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
प्रास्ताविकात पै.नाना डोंगरे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी व स्त्री जन्माच्या स्वागतासाठी डोंगरे संस्थेच्या वतीने राबविण्यात येणार्या विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शासनाचा आदर्श युवती पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय खेळाडू प्रियंका डोंगरे-ठाणगे, राष्ट्रीय खेळाडू प्रतिभा यांचा सत्कार करण्यात आला.
सुवर्णा जाधव म्हणाल्या की, महिला कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे. बहिण, आई, पत्नी म्हणून स्त्री असते. मात्र मुलगी म्हणून तीला नाकारले जात आहे. ही मानसिकता महिलांच्या पुढाकारानेच बदलणार आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असून, तीच्या जन्माचे स्वागत झालेच पाहिजे. मुलगा वंशाचा दिवा असला तरी, वंशाला प्रकाशमान करणारी पणती ही मुलगी असल्याचे त्यांनी सांगितले. मंदा साळवे यांनी प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. स्त्री शिक्षणाचे महत्त्व ओळखून मुलींना उच्ची शिक्षित करावे. स्त्रीचा सन्मान राखला गेल्यास समाजाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी कालची व आजची महिला, महिलांचे आरोग्य, निरोगी जीवनशैली, महिला विषयक कायदे या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग लाभला. आभार उत्तम कांडेकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, क्रीडा अधिकारी दिपाली बोडखे, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे यांचे मार्गदर्शन लाभले.