बुथ हॉस्पिटलच्या ऑक्सीजन प्रकल्पाचे शुभारंभ
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकटकाळात उत्कृष्ट कार्य करुन बुथ हॉस्पिटलने प्रशासनाला सहकार्य केले. इच्छाशक्तीच्या जोरावर या हॉस्पिटलने उत्तम रुग्णसेवा दिली. याच इच्छाशक्तीने हॉस्पिटलमध्ये मोठा ऑक्सीजन प्रकल्प उभा राहिला आहे. अहमदनगर शहराचा कोरोना महामारीतील जेंव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा बुथ हॉस्पिटलने दिलेले योगदान सुवर्णाक्षरांनी कोरले जातील असे गौरवोद्गार बुथ हॉस्पिटलच्या रुग्णसेवेद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढले.
कोरोना महामारीत सर्वसामान्यांसाठी नवसंजीवनी ठरलेल्या द साल्वेशन आर्मी संचलित इव्हॅन्जलिन बुथ हॉस्पिटलच्या ऑक्सिजन प्रकल्पाचे शुभारंभ मंगळवारी (दि.22 फेब्रुवारी) जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नरेंद्र फिरोदिया, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, मसाप सावेडी शाखेचे प्रमुख कार्यवाह जयंत येलूलकर, टेरिटोरियल कमांडर कर्नल वानलालफेला, बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, ज्योती कळकुंबे, कॅप्टन सुनिल साळवे, लेफ्टनंट सुरज वंजारे, कॅप्टन जयमाला साळवे, लेफ्टनंट प्रेरणा वंजारे आदी हॉस्पिटलचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविकात देवदान कळकुंबे यांनी पहिल्या लाटेत काही साधन व मनुष्यबळ नसताना देखील बुथ हॉस्पिटलने इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाशी लढा दिला. यामुळे अनेकांचे जीव वाचले. लोकांमध्ये बुथ हॉस्पिटलबद्दल एक वेगळा विश्वास निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने तब्बल एक कोटी रुपयांचा ऑक्सीजन प्रकल्प उभा राहिला असून, दररोज शंभर सिलेंडर भरतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ऑक्सिजनसाठी बुथ हॉस्पिटल स्वयंपूर्ण झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर कोरोना काळात रुग्णांना दर्जेदार जेवण व हॉस्पिटलला इतर आरोग्य सुविधा पुरविणारे नरेंद्र फिरोदिया यांचे त्यांनी विशेष आभार मानले.
नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, बुथ हॉस्पिटलला रुग्णसेवेचा मोठा वारसा लाभला आहे. हा वारसा त्यांनी कोरोना काळातही पुढे चालवला. त्यांनी केलेल्या कार्याला तोड नाही. कोरोनाची भिती असताना त्यांनी रुग्णांमध्ये एक विश्वास निर्माण केला. चांगली सेवा देऊन रुग्णांमधील भीती दूर केली. यामुळे अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले. कोरोनाकाळात त्यांनी मानवसेवा केल्याचे त्यांनी सांगितले. जयंत येलूलकर म्हणाले की, कोरोनामुळे समाज संकटात असताना बुथ हॉस्पिटलने आधार दिला. कोरोना रुग्णांना जगण्याची उमेद देऊन, कोरोनाशी लढण्याचे सामर्थ्य व बळ निर्माण केले. देवदूत रूपाने बुथ हॉस्पिटलने रुग्णांची सेवा केल्याचे त्यांनी सांगितले. कर्नल वानलालफेला यांनी बुथ हॉस्पिटलच्या सर्व कर्मचार्यांच्या एकजुटीने सर्व कार्य शक्य झाले. अशाच प्रकारे सेवा देण्याचे कार्य सुरु ठेवण्याचे सांगून, त्यांनी हॉस्पिटलच्या सर्व कर्मचार्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुथ हॉस्पिटलच्या सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.