फिरोदिया शिवाजीयन्स विरुध्द फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमीत फुटबॉलचा अंतिम सामना रंगणार
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी फिरोदिया शिवाजीयन्स विरुध्द फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमीत होणार आहे. दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे सादारीकरण करुन अंतिम फेरीत मजल मारली आहे. शुक्रवारी (दि. 27 मे) रोजी झालेल्या सामन्यात फिरोदिया शिवाजीयन्सने बाटा एफसीचा 1-0 तर फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमीने आंबेडकर एफसीचा 1-0 ने पराभव केला.
उपांत्य फेरीत फिरोदिया शिवाजीयन्स विरुध्द फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमीत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात फिरोदिया शिवाजीयन्सचा खेळाडू हिमांशू चव्हाण याने उत्तरार्धात 1 गोल केला. फ्रेंडस स्पोर्टसला शेवटच्या क्षणापर्यंत एकही गोल करता आला नाही. 1-0 ने फिरोदिया शिवाजीयन्सने फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमीवर विजय मिळवला.
दुसरा सामना फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमी विरोधात आंबेडकर एफसीत शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार राहिला. फ्रेंडसचा निहाल पवार याने 1 गोल करुन विजश्री खेचून आनला. आंबेडकर एफसीचे खेळाडू अंतिम क्षणापर्यंत गोल करण्याच्या तयारीत होते. मात्र फ्रेंड्सच्या खेळाडूंना त्यांना रोखून धरण्यात यश आले. 1-0 ने फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमीने आंबेडकर एफसीवर विजय मिळवला. स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रसाद पाटोळे, सुशील लोट, सागर चेमटे, अतुल नकवाल यांनी काम पाहिले.
भुईकोट किल्ला मैदान येथे होत असलेल्या या फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजीयन्स विरुध्द फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमी सातव्या अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषकासाठी एकमेकांना भिडणार आहेत. दोन्ही संघ समान तुल्यबळ असल्याने हा सामना रंगतदार होणार आहे.