विविध वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुल स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली. केडगाव वेस पासून या दिंडी सोहळ्याचे प्रारंभ झाले. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदूंगचा निनाद, जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत बाल वारकर्यांनी केलेल्या रिंगण सोहळ्याने सर्वांची मने जिंकली. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभुषेत दिंडीत सहभागी झालेले चिमुकले दिंडीचे आकर्षण ठरले.
स्कुलच्या प्राचार्या निकिता कटारिया व संस्थापक आनंद कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीची सुरुवात करण्यात आली. डोक्यावर पांढरी टोपी, कपाळी गंध, पायजमा, बंडी या पोशाखात लहान मुले, तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन मुलीं दिंडीत सहभागी झाल्या होत्या. तर स्कूलच्या सुट-बुटाच्या गणवेशातील विद्यार्थी देखील या दिंडीत सहभागी झाले.
आनंद कटारिया यांनी संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी मुलांना आपल्या संस्कृतीची माहिती होणे आवश्यक आहे. याच भावनेतून इंग्रजीचे शिक्षण देत असताना आपल्या भारतीय संस्कृतीच्या संस्काराची रुजवण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
दिंडीचे केडगाव परिसरातून मार्गक्रमण होवून स्वामी समर्थ मंदिर येथे बाल वारकरींनी भजन, गवळण सादर केले. विद्यार्थ्यांना श्री हरी ओम भजनी मंडळीच्या महिलांनी साथ दिली. दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षकांनी परिश्रम घेतले.