स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा आरएमटी ग्रुपचा उपक्रम
हत्ती, घोडे, उंट, लेझीम पथक, ढोलपथकाचा समावेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अभियानांतर्गत देशभर विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. धैर्य, शौर्य, आणि अभिमानाचे 75 वर्षे साजरी करण्यासाठी केडगावच्या भुषणनगर येथील झेंडा चौक येथे रविवारी (दि.14 ऑगस्ट) दुपारी 3 वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य रॅलीचे प्रमुख आकर्षण 350 फुटी तिरंगा राहणार आहे. रॅलीची सुरुवात झेंडा चौक, आरएमटी फिटनेस क्लब येथून होणार असून, यामध्ये सहभागी होण्याचे केडगावकरांना आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या भारत देशाच्या वैविध्यतेला आणि भव्यतेला साजेल अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण आकर्षणांनी ही तिरंगा रॅली सजलेली असेल. यात हत्ती, घोडे, उंट, लेझीम पथक, ढोलपथक, तसेच भारतीय संस्कृतीचा मिलाप दर्शविणार्या वेशभूषा इत्यादींचा समावेश असणार आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, अनेक क्रांतिकारकांनी हालअपेष्टा सोसल्या, आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या या बलिदानामुळेच या वर्षी आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. क्रांतीकारकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपल्या तिरंग्याचा, देशाचा सोहळा साजरा करण्यासाठी आरएमटी ग्रुप ने ही तिरंगा रॅली आयोजित केली आहे.
सर्व नागरिकांनी मातृभूमीचा हा ऐतिहासिक सोहळा साजरा करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9371480594 या क्रमांकावर संपर्क करावा.