मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात शनिवारी कापडबाजारात जातीय सलोख्याला तडा जाईल असे वर्तन करुन दुकानदार व ग्राहकांना वेठीस धरण्यात आले. तर दोन समाजात तेढ पसरेल असे चिथावणीखोर वक्तव्य करण्यात आले असून, याप्रकरणी त्वरीत दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.
व्यापारी मंडळी गेल्या अनेक वर्षापासून गुण्यागोविंदाने मोची गल्ली, कापड बाजार, सारडा गल्ली या बाजारपेठ भागात व्यवसाय करीत आहे. प्रशासनासोबत जातीय सलोखा अन्य कार्यक्रम घेऊन या भागात सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्याचे काम केले जाते. या भागात बहुतांश दुकानात महिलावर्गाशी संबंधित वस्तू विकल्या जातात. त्यामुळे बाजारपेठेत महिला ग्राहकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत शनिवारी (दि.12 मार्च) रोजी बाजारपेठेत काही लोकांनी येऊन घोषणाबाजी केली. जातीय सलोख्याला तडा जाईल असे वक्तव्य केले. काहींनी आरडाओरडा केला. राजकीय पक्षाच्या नावाने घोषणाही देण्यात आल्या. त्यामुळे बाजारात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. खरेदीसाठी आलेल्या महिला आणि अन्य ग्राहकही यामुळे गोंधळून गेले. अशा परिस्थितीत बाजारात गोंधळ निर्माण करणार्यांवर कारवाई करावी. कोणाचे वैयक्तिक वाद असेल तर त्यांनी ते कायदेशीर आणि न्यायालयीन मार्गाने मिटवावे. त्यासाठी बाजारात येऊन सर्व दुकानदारांनी ग्राहकांना वेठीस धरले जाऊ नये. संबंधितांनी पोलिस प्रशासनाला संबोधून बदनामीकारक वक्तव्य केले आहे. त्यामुळे पोलीसांच्या जनमानसातील प्रतिमेला तडा गेला आहे. या प्रकारामुळे वेळीच आळा घालून बाजारपेठेतील शांतता कायम टिकवून ठेवण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
कोरोनाच्या संकटानंतर बाजारपेठ कुठेतरी सावरण्यास सुरुवात झाली आहे. अशा घटना घडल्यास बाजारपेठेवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. शिवाय यामुळे शहरातील शांतता भंग होऊन वातावरण बिघडू शकते. त्यामुळे या प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.