उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईत प्रवेश
गारदे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्षपदाची व उद्योग आणि व्यापार विभागाची जबाबदारी
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनंत गारदे यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबई येथे राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करुन राष्ट्रवादीच्या उद्योग आणि व्यापार विभागाच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते उपस्थित होते.
अनंत गारदे हे शहराच्या राजकारणात मागील तीस ते पस्तीस वर्षापासून कार्यरत आहे. काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. ते काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत होते. काही कारणास्तव त्यांनी महिनाभरापूर्वी आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा दिला होता. आमदार संग्राम जगताप यांचे शहरासाठी असलेले विकासात्मक व्हिजन व सुरु असलेल्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी पक्षात सर्वांना सन्मानाची वागणुक देऊन काम करण्याची संधी दिली जात आहे. विकास हाच अजेंडा ठेऊन शहराची विकासात्मक दिशेने वाटचाल सुरु असून, गारदे यांच्या माध्यमातून पक्षाचे चांगले संघटन होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रा. माणिक विधाते यांनी गारदे यांच्या पुढीक कार्यास शुभेच्छा दिल्या. गारदे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या ध्येय धोरणानूसार समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.