शिक्षक परिषदेचे शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- 12 व 24 वर्षांचे सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित करावे व एमसीइआरटी यांनी दिलेल्या 15 मे ते 14 जून हा प्रशिक्षणाचा कालावधी पाळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे मुंबई विभाग अध्यक्ष उल्हास वडोदकर व कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
शिक्षक परिषदेने सतत प्रयत्न केल्याने 26 ऑगस्ट 2019 ला विना प्रशिक्षण वरिष्ठ व निवडश्रेणी देण्याची मागणी शालेय शिक्षण विभागाने केली होती. यासंदर्भात 26 ऑगस्ट 2019 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते. मागील दोन वर्षांमध्ये विना प्रशिक्षण निवड व वरिष्ठ श्रेणी शिक्षकांना मिळू शकलेली नाही. शासनाकडून प्रशिक्षणाची सोय करण्यात आलेली नव्हती. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने प्रयत्न करून प्रशिक्षणाची अट शिथिल करून वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्यासंदर्भात माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने परिपत्रकही काढले होते. मात्र राज्यात सर्वच लेखा अधिकार्यांनी आक्षेप घेऊन वरिष्ठ व निवडश्रेणी देण्याचे टाळले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्रशिक्षणासाठी सतत दोन वर्षे पत्रव्यवहार करत आहे. 23 मार्च रोजी मुंबई येथे अनेक आमदार व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सोबत बैठकीत शिक्षणमंत्र्यांनी विना प्रशिक्षण वरिष्ठ व निवडश्रेणी देण्याची मागणी फेटाळून लावली. त्या बैठकीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (पुणे) संचालक यांनी 15 मे 14 जून 2022 या कालावधीत प्रशिक्षण आयोजित केले जाईल, अशी माहिती दिली. शिक्षक परिषदेने अगोदर पत्रव्यवहार करून 30 एप्रिल पर्यंत प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी सुचवले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
उन्हाळी सुट्टीमध्ये सदर प्रशिक्षण असणार आहे. मात्र या अगोदरच अनेक शिक्षकांनी मूळ गावी किंवा परगावी जाण्यासाठी आरक्षण केले आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी इंटरनेट सुविधा नसल्यास रोजच्या रोज त्याच कालावधीत प्रशिक्षण घेणे शक्य होणार नाही. प्रशिक्षणाचे व्हिडिओ ऑफलाइन पद्धतीने त्या दिवशी शिक्षकांना मिळावे. तसेच रोजच्या शेड्युलची वेळ चुकल्यास प्रशिक्षणार्थींना ऑफलाइन पद्धतीने मोबाईल व इंटरनेटच्या मदतीने दिलेल्या मुदतीत प्रशिक्षण पूर्ण करण्याची सुविधा व मुभा देण्यात यावी. रोजच्या प्रशिक्षणाचे व्हिडिओ युट्युब वर रोज टाकावे किंवा एससीईआरटीच्या साइटवर त्यादिवशी रोजचे शेड्युल संपल्यावर लगेच उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे शिक्षकांना त्यांच्या सोयीने प्रशिक्षण पूर्ण करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे शिक्षकांचे प्रशिक्षण बुडणार नाही. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश भागात लोडशेडिंगची समस्या असल्याने प्रशिक्षण पूर्ण करणे गैरसोयीचे जाईल. एखाद्या दिवशी प्रशिक्षणास उपस्थित राहता न आल्यास त्याला व्हिडिओच्या माध्यमातून प्रशिक्षण पूर्ण करण्याची संधी देण्यात यावी. अशा प्रकारची व्यवस्था आपल्या स्तरावरून करावी. तसेच 15 मे पेक्षा अधिक कालावधी न घेता त्या अगोदरच प्रशिक्षण पूर्ण करावे व 90 हजार पेक्षा जास्त शिक्षक प्रशिक्षण घेत असल्याने गटवारी करुन त्यांचे प्रशिक्षण पुर्ण करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.