अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी केले जाणार होते उपोषण
अहमदनगर(प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा देणारे अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पिडीत कुटुंबीयांना धमकावल्याप्रकरणी आरोपीच्या भाऊ विरोधात पारनेर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पारनेर तालुक्यातील एका गावात 4 एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीला शाळेतून फूस लावून पळविण्यात आले. याबाबत पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या कुटुंबीयांना त्या गावातील एका व्यक्तीविरोधात संशय असून, त्या व्यक्तीविरोधात व मुलीला पळवून नेण्यास सहाय्य करणार्या त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती व पिडीत कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र आरोपीच्या भावाने पिडीत कुटुंबीय व सामाजिक कार्यकर्ते रोडे यांना फोन करुन उपोषण थांबवावे व भावाचा नाव न घेण्यासाठी धमकावले. या प्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी पारनेर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यावरुन संबंधितावर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.