संदीप तापकीर यांना कै. सरदार आबासाहेब मुजूमदार पुरस्कार प्रदान
मोडीकिरण पुस्तकाचे प्रकाशन व स्व. सुशिलादेवी प्रकाश अग्रवाल उद्यानचे उद्घाटन
अहमदनगर (प्रतिनिधी)- इतिहास वर्तमानात प्रेरणा व शिकवण देत असतो. शहराचा ऐतिहासिक वारसा जतन करुन पर्यटनाला चालना देता येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले. तर स्मार्ट सिटीसाठी लोकसहभाग आवश्यक असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अहमदनगर ऐतिहासिक वस्तु संग्रहालय व संशोधन केंद्र येथील स्व. सुशिलादेवी प्रकाश अग्रवाल उद्यान उद्घाटन, कै. सरदार आबासाहेब मुजूमदार पुरस्कार वितरण व मोडीकिरण पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी जिल्हाधिकारी भोसले बोलत होते. यावेळी माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. दिपक अग्रवाल, आँचल अग्रवाल, डॉ. रविंद्र साताळकर, डॉ. संतोष यादव, अॅड. गौरव मिरीकर, संदीप तापकीर, मोहनशेठ मानधना, गौतम मुनोत आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे जिल्हाधिकारी म्हणाले की, शासनाचे अनेक रेकॉर्ड मोडीलिपी मध्ये असून, मोडीकिरण पुस्तक प्रशासनाला मार्गदर्शक ठरणार आहे. वाड्यांचा इतिहास सांगून, इनामी, वतनदार जमीनीची माहिती दिली. देशातील सर्व विद्यापिठात इतिहासाचे अभ्यास करणार्यांना कार्यशाळेसाठी आमंत्रित करुन शहराचा इतिहास देशभर घेऊन जाण्याचा संकल्प व्यक्त केला.
ऐतिहासिक वस्तु संग्रहालय येथील शहाजीराजे भोसले व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्व. सुशिलादेवी प्रकाश अग्रवाल उद्यानचे उद्घाटन कुलगुरु निमसे यांनी केले. तर जिल्हाधिकारी भोसले यांच्या हस्ते संदीप तापकीर यांना कै. सरदार आबासाहेब मुजूमदार पुरस्कार देऊन, उपस्थितांच्या हस्ते मोडीकिरण पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. रविंद्र साताळकर यांनी मागील पाच ते सहा वर्षापासून जिल्ह्याला लाभलेल्या जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने सुसज्ज व अद्ययावत वास्तु संग्रहालय उभे राहिले आहे. ऐतिहासिक वस्तु संग्रहालय नगरचे भूषण असून, ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचे काम करत आहे. विविध उपक्रमातून इतिहासाचा प्रचार प्रसार केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. सर्जेराव निमसे म्हणाले की, सुंदर उद्यानाने वस्तुसंग्रहालयाचे सौंदर्य फुलले आहे. आपल्या शहराचा इतिहास सर्वांना ज्ञात असला पाहिजे. वर्तमानात जगताना इतिहासाचा अभ्यास करून उज्वल भविष्याचा वेध घेता आला पाहिजे. या प्रकारे समाजाचा व राष्ट्राचा विकास साधता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मलिक अंबर, अहमद निजामशहा यांच्यासह स्वातंत्र्य संग्रामातील इतिहास स्पष्ट करुन, जिल्ह्यातील सहकारी चळवळीचा उदय त्यांनी सांगितला.
सत्काराला उत्तर देताना संदीप तापकीर यांनी महाराष्ट्रातील 450 गड, कोट पाहिले असून, प्रत्येक जिल्हानिहाय पुस्तके लिहिण्याचा संकल्प आहे. सहा पुस्तके लिहून झाली असून, सातवी पुस्तक अहमदनगर जिल्हा वरती आहे. सध्या किल्ल्यांची दुरावस्था होत असून, गड-किल्ले यांकडे सध्याचा येणारा वर्ग चुकीचा असल्याची खंत व्यक्त केली. डॉ. संतोष यादव म्हणाले की, मोडी लिपीचा अभ्यास करताना स्वतःला अनेक अडचणी आल्या. या अडीअडचणी पुढच्या पिढीला येऊ नये, यासाठी हे मोडीकिरण पुस्तक मार्गदर्शक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. दीपक अग्रवाल यांनी शहराला विशाल ऐतिहासिक वारसा लाभला असून, हा वारसा जपला गेला पाहिजे. अहमदनगर ऐतिहासिक वस्तु संग्रहालयसाठी उद्यानाच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलला असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा चिमटे यांनी केले. आभार भूषण देशमुख यांनी मानले.