• Mon. Dec 9th, 2024

आशा व गट प्रवर्तकांचा सोमवारी जिल्हा परिषदेवर थाळी-लाटणे घेऊन मोर्चा

ByMirror

Feb 10, 2022

पाच महिन्यापासूनचे वेतन थकल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- आशा व गट प्रवर्तकांना मागील पाच महिन्यापासूनचे वेतन मिळाले नसल्याने तारीख पे तारीख सुरु आहे. थकित वेतन मिळण्यासाठी आशा व गट प्रवर्तक सोमवारी (दि.14 फेब्रुवारी) जिल्हा परिषदेवर थाळी-लाटणे घेऊन मोर्चाने धडकणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांनी दिली.
आशा व गट प्रवर्तक यांचे सप्टेंबर 2021 पासूनचे थकित मानधन वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊन देखील शासनाने सदर मानधन आशांना दिलेले नाही. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आशा व गट प्रवर्तक संघटनेचे अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर व कॉ. सुरेश पानसरे यांच्या नेतृत्वा खाली हे आंदोलन केले जाणार आहे. अत्यंत गरिब परिस्थितीतून आशा सेविका काम करत आहे. शासनाने कोरोना काळात त्यांना दहा-दहा तास काम करून घेतले. आशा काम करत असताना त्यांना मानधन प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला देऊ असे संघटनेच्या पदाधिकारी यांना लेखी आश्‍वासन देऊन देखील, शासनाने त्यांचे पाच महिन्यांचे मानधन दिलेले नाही. मध्यंतरीच्या काळात त्यांचे मानधन वाढवून दिले. परंतु फक्त कागदोपत्री प्रत्यक्ष हातात काहीही पडलेले नाही. परंतु नियमीत वेतन देखील मिळाले नसल्याने आशा सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
जो पर्यंत मानधनाची थकबाकी मिळत नाही, तो पर्यंत शासनाचे कुठलेही काम करणार नसल्याचा निर्धार आशा व गट प्रवर्तकांनी केला आहे. कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक व मानसन्मान नको, तर कुटुंब चालविण्यासाठी थकित वेतन देण्याची मागणी करण्यात आली आहे. कोरोना काळात सेवा देत असताना पैश्या अभावी चांगले उपचार न मिळाल्याने अनेक आशा दगावले असल्याचेही संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या जिल्हाव्यापी मोर्चात सर्व आशा व गट प्रवर्तकांना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे, विडी कामगार नेते कॉ. कारभारी उगले, कॉ. संजय नागरे, कॉ. आप्पासाहेब वाबळे, जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. सुवर्णा थोरात आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *