ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या सामाजिक उपदेशाने भाविक मंत्रमुग्ध
अहमदनगर (प्रतिनिधी)- आव्हाडवाडी (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता ह.भ.प. अदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड) यांच्या काल्याचे किर्तनाने झाली. हनूमान मंदिरात भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या सात दिवसाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
ह.भ.प. आदिनाथ महाराज म्हणाले की, आजच्या कलियुगात जीवनाच्या सुख, समाधानासाठी नामस्मरणाची गरज आहे. अहंकाराने मनुष्याची विनाशाकडे वाटचाल सुरु होते. अहंकार निर्माण झाल्याने त्याला चांगले, वाईट यामधील फरक समजत नाही. अहंकाराची जोडवे उतरविल्याने खरा परमार्थ साधला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर त्यांच्या श्रीकृष्ण चरित्र कथेत उपस्थित भाविक भक्तिरसात न्हाऊन निघाले. किर्तनाच्या समारोपनंतर अदिनाथ महाराज यांचा उपस्थित ग्रामस्थांनी पुष्पहाराने सत्कार केला. सप्ताहाचे हे सातवे वर्ष होते. गावातील ग्रामस्थ या धार्मिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सप्ताहनिमित्त सात दिवस पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, हरीपाठ व किर्तनाने गाव भक्तीरसात न्हाऊन निघाले. काल्याच्या किर्तनाच्या समारोपनंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास माजी आमदार शिवाजी कर्डिले, उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड आदींनी भेट देऊन धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला.