महापुरुषांची प्रेरणा घेऊन सामाजिक व धार्मिक ऐक्य प्रस्थापित होण्याची गरज -अमित काळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी आयटी सेलचे जिल्हा संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, युवक जिल्हा उपाध्यक्ष महादेव भिंगारदिवे, युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण वाघमारे, युवक तालुका उपाध्यक्ष विलास साळवे, युवक तालुका सरचिटणीस निखील सुर्यवंशी, नितीन निकाळजे, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय नामदे, सुरेश तनपुरे, अशोक भोसले, सागर देवडे आदी युवक उपस्थित होते.
अमित काळे म्हणाले की, महापुरुषांची जयंती फक्त घोषणा देवून वाद्यांवर नाचण्यासाठी नव्हे, तर त्यांचे विचार आत्मसात करुन प्रेरणा घेण्यासाठी आहे. शिवाजी महाराज एका समाजापुरते मर्यादित नसून, त्यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. समाजातील महापुरुष देखील सध्या जाती धर्मात वाटले जात असून, त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन सामाजिक व धार्मिक ऐक्य प्रस्थापित होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.