डॉ. गोपाल बहुरूपी अकॅडमी ऑफ मेडिकल एज्युकेशन अॅण्ड लर्निंग एक्सलन्स व न्यूक्लेअस हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर यांचा संयुक्त उपक्रम
डॉक्टरांना नवीन उपचार पद्धतीचा स्वीकार करणे काळाची गरज -खासदार डॉ. सुजय विखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. गोपाल बहुरूपी अकॅडमी ऑफ मेडिकल एज्युकेशन अॅण्ड लर्निंग एक्सलन्स व न्यूक्लेअस हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नगर- कल्याण रोड येथील आय.एम.ए. भवन येथे संधिवात या आजारवर विशिष्ट अद्ययावत उपचार पद्धती या विषयावर डॉक्टरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. पांडुरंग डौले यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. गोपाल बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. हिमांशी चौधरी, डॉ. राहुल पंडित, डॉ. चेतना बहुरुपी, डॉ. शितल बोरकर आदींसह शहर व जिल्ह्यातील डॉक्टर उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. गोपाल बहुरुपी म्हणाले की, तंत्रज्ञान व विज्ञानाच्या प्रगतीने वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. बदलत्या काळानुरूप नव-नवीन बदल स्वीकारण्याची गरज आहे. एज्युकेशन टू ऑल हे उद्दिष्ट समोर ठेवून हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या वतीने विविध आजारांवर कार्यशाळेचे आयोजन केले जात आहे. नवनवीन उपचार पध्दती डॉक्टरांसह सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी व समाजात जागृती करण्याच्या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत केरळ येथील डॉ. विनोद रवींद्रन यांनी ऑनलाइन संवाद साधून संधिवात या आजारावर आरोग्य क्षेत्रात उपचार पद्धतीबाबत झालेल्या बदलाची माहिती दिली.
या कार्यशाळेस खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट देऊन डॉक्टरांशी संवाद साधला. डॉ. विखे म्हणाले की, विज्ञान क्षेत्रात नवनवीन संशोधन होत असताना वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. विविध आजारांवर अद्यावत तंत्रज्ञानामुळे नवनवीन उपचार पध्दती येत आहे. डॉक्टरांना नवीन उपचार पद्धतीचा स्वीकार करणे काळाची गरज बनली आहे. समाजाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी नवीन वैद्यकिय ज्ञानाचा प्रचार-प्रसारासाठी डॉ. बहुरुपी यांनी घेतलेला पुढाकार दिशादर्शक आहे. पूर्वी रुग्ण एकच फॅमिली डॉक्टरकडे जायचे मात्र आजारांची वाढती संख्या, वेगवेगळ्या उपचार पध्दती यांमुळे सुपर स्पेशलिटीचे युग निर्माण झाले आहे. रुग्णांचा स्पेशलिटी डॉक्टरांकडे जाण्याचा कल वाढत आहे. वैद्यकीय क्षेत्रात विविध शाखा निर्माण होत असून, रुग्णांची हेळसांड न होता योग्य उपचार मिळणे हे डॉक्टरांचा उद्देश अशा कार्यशाळेतून सिध्दीस जाणार आहे. रुग्णसेवेचे व्रत घेऊन सर्वसामान्यांना सेवा देणार्या डॉक्टरांचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेत डॉ. बहुरुपी, डॉ. बोरकर, डॉ. चौधरी यांनी संधिवात या आजाराचे विविध प्रकार व त्यावर अद्यावत उपचार पध्दतीवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी शहरासह जिल्ह्यातील तीनशे डॉक्टरांची सहभाग लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल आगळे यांनी केले. आभार डॉ. चेतना बहुरुपी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनमोहन बहरुपी व न्यूक्लेअस हॉस्पिटलच्या सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.