मरणोत्तर नेत्रदानाची जनजागृती करुन नेत्रदान संकल्प पत्राचे वाटप
दीन-दुबळ्यांच्या जीवनात आनंदऋषीजी हॉस्पिटल आनंद व प्रकाश निर्माण करत आहे -हस्तीमलजी मुनोत
अहमदनगर (प्रतिनिधी)- दीन-दुबळ्यांच्या जीवनात आनंदऋषीजी हॉस्पिटल आनंद व प्रकाश निर्माण करण्याचे कार्य करीत आहे. आनंदऋषीजी महाराजांच्या विचाराने सेवाभाव हे ध्येय समोर ठेऊन कुंदनऋषीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. लाखो गरजूंना आरोग्यसेवेच्या माध्यमातून नवजीवन देण्याच्या कार्यात अनेकांचे हातभार लागत असल्याचे प्रतिपादन मर्चंट बँकेचे संस्थापक संचालक हस्तीमलजी मुनोत यांनी केले.
राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त डॉ. प्रकाश कांकरिया परिवाराच्या वतीने आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी मुनोत बोलत होते. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, शिबीराचे आयोजक डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सुधा कांकरिया, डॉ. वर्धमान कांकरिया, रत्नप्रभा छाजेड, मर्चंट बँकेचे चेअरमन आनंदरामजी मुनोत, व्हाईस चेअरमन सुभाष बायड, संचालक सुभाष भांड, मिनाताई मुनोत, किशोर गांधी, संजय बोरा, संजय चोपडा, किरण कांकरिया, नरेंद्र बाफना, डॉ. विजय भंडारी, संतोष बोथरा, निखील लोढा, बाबुशेठ लोढा, आशिष भंडारी, मिलापचंद पटवा, सुभाष मुनोत, प्रकाश छल्लाणी, डॉ. कौस्तुभ घोडके, नेत्रालयाचे प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, राज्यातील एक अद्यावत नेत्र विभाग म्हणून आनंदऋषीजी हॉस्पिटलकडे पाहिले जाते. हॉस्पिटल पर्यंत पोहचू न शकणार्या बीड व अहमदनगर जिल्ह्यातील दुर्बल घटकांना वाडी-वस्तीवर जाऊन हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा पुरवली जात आहे. दररोज मोतीबिंदूसह इतर नेत्र विकाराच्या 60 ते 70 शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत. डॉ. प्रकाश कांकरिया सेवाभाने हॉस्पिटलला योगदान देत असून, नेत्र म्हणजे प्रकाश कांकरिया ही ओळख त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण केली आहे. या नेत्रालय विभागाच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर मोतीबिंदू, काचबिंदू व इतर डोळ्यांचे अवघड शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या की, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून नेत्रज्योती प्रज्वलित करुन डोळ्यांचे अंधत्व दूर केले जात आहे. देशात मोठ्या संख्येने अंध बांधव डोळ्यांच्या प्रतिक्षेत असून, मरणोत्तर नेत्रदानाचे असलेले अज्ञान व अंधश्रध्देमुळे नेत्रदानाचे प्रमाणत अत्यल्प आहे. नेत्रदान पंधरवडातंर्गत नेत्रदानाची जनजागृती केली जात त्यांनी नेत्रदानाचा संकल्प करण्याचे आवाहन केले. डॉ. कौस्तुभ घोडके यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलचा नेत्रालयाचा स्वतंत्र अद्यावत विभाग सेवेसाठी सज्ज असून, लहान मुलांपासून वृध्दांपर्यंतच्या डोळ्याच्या अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्याची माहिती दिली.
या शिबीरात 520 रुग्णांची मोतिबिंदू, रेटिना आदी डोळ्यांच्या विकारांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. शिबीराच्या माध्यमातून मोतिबिंदू, रेटिना, तिरळेपणा व लहान मुलांचे मोतिबिंदू शस्त्रक्रिया अत्यल्पदरात होणार आहे. तसेच या शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत मोफत केल्या जाणार आहेत. उपस्थितांचे आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.
मरणोत्तर नेत्रदानाची जनजागृती
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये झालेल्या मोफत नेत्र तपासणी शिबीरात डॉ. सुधा प्रकाश कांकरिया यांनी मरणोत्तर नेत्रदानाची जागृती केली. अंधाच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी मरणोत्तर नेत्रदानशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट करुन, यावेळी नेत्रदान संकल्प पत्राचे वाटप करण्यात आले.