• Thu. Dec 12th, 2024

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेचे महोत्सव -आयुक्त डॉ. पंकज जावळे

ByMirror

Aug 24, 2022

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत अस्थिरोग तपासणी, मणके व सांधेबद्दलची शस्त्रक्रिया शिबीराला ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेचे महोत्सव सुरू असून, याचा गरजू घटकातील लोकांना लाभ मिळत आहे. एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ!… या संत तुकाराम महाराजांच्या वचनाची प्रचिती या हॉस्पिटलच्या कार्यातून येत आहे. आरोग्य सेवेच्या या मंदिरात समाजासाठी अनेक व्यक्ती झटून योगदान देत आहे. अशाप्रकारे सेवाभावाने आपले उत्तरदायित्व पार पडल्यास अनेक प्रश्‍न सुटणार असल्याची भावना महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी व्यक्त केली.


राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त इंद्रकला सतीश चोपडा परिवाराच्या वतीने आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थिरोग तपासणी, मणके व सांधेबद्दलची शस्त्रक्रिया शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी आयुक्त जावळे बोलत होते. याप्रसंगी अन्न- औषध प्रशासनाचे निरीक्षक एच.वाय. मेतकर, शिबीराचे आयोजक इंद्रकला सतीश चोपडा, सतीश चोपडा, रितेश चोपडा, लाभेश चोपडा, मोनाली चोपडा, पायल चोपडा, संतोष बोथरा, प्रकाश छल्लाणी, डॉ. आशिष भंडारी, अमित पटवा, जितेंद्र मुथा, विवेक जाधव आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, गरिबांची सेवा या हेतूने आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य सुरु आहे. समाजाकडून समाजासाठी चालवलेल्या आरोग्यसेवेने गरजूंना याचा लाभ मिळत आहे. अनेक मानवतेचे मसीहा या सेवेत आपले योगदान देत असून, कर्तव्यदक्ष अधिकारी यांची साथ लाभत आहे. बावीस वर्षापासून सुरू असलेल्या आरोग्य सेवेच्या यज्ञात सेवाभावाने प्रत्येकाचे योगदान मिळत असल्याने, हॉस्पिटलचे कोणतेही कार्य थांबत नसून, मनुष्यरुपी ईश्‍वरसेवा अविरत सुरु असल्याचे सांगून, हॉस्पिटलमधील दर्जेदार व अल्पदरात असलेल्या सेवांची त्यांनी माहिती दिली.


अन्न- औषध प्रशासनाचे निरीक्षक एच.वाय. मेतकर यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये माणुसकीच्या भावनेने सुरु असलेल्या आरोग्यसेवेचा लाभ शेवटच्या घटकांना मिळत आहे. समाजातील दुर्बल घटकांना महागाईच्या काळात आरोग्यसेवेद्वारे धीर व नवजीवन दिले जात असून, या सेवेत आपले नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. इंद्रकला सतीश चोपडा यांनी आरोग्यसेवेची संधी चोपडा परिवाराला या हॉस्पिटलच्या रुपाने मिळाली आहे. प्रत्येक धर्मात दानचे महत्त्व सांगितले असून, ते दान सत्पात्री असावे. या रुग्णसेवेच्या मंदिरात गरजूंना केलेली मदत सत्पात्री दान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या शिबीरात 225 रुग्णांची मोफत अस्थिरोग तपासणी करण्यात आली. यामध्ये डॉ. विशाल शिंदे व डॉ. अमित सुराणा यांनी रुग्णांची तपासणी केली. गरजेनुसार रुग्णांची सांधेबदली, गुडघा व खुबा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अल्पदरात करण्यात येणार आहे. तर या शस्त्रक्रिया जन आरोग्य योजनेतंर्गत मोफतही होणार आहेत. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *