आनंदऋषीजी सारखे आरोग्य मंदिर सर्वसामान्यांना आधार -महापौर रोहिणीताई शेंडगे
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत आरोग्यसेवा व सुसज्ज हॉस्पिटलचे महत्त्व सर्वांना कळाले. आनंदऋषीजी सारखे आरोग्य मंदिर सर्वसामान्यांना आधार ठरत आहे. सर्वसामान्य रुग्णांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध होत असल्याचे स्पष्ट करुन आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून चालू असलेल्या रुग्णसेवेचे महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी कौतुक केले.
राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या 30 व्या स्मृतीदिनानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्व. मदनलालजी छाजेड यांच्या स्मरणार्थ शांताबाई मदनलाल छाजेड, मनोज छाजेड, मुकेश छाजेड, अशोकलाल छाजेड व स्कायब्रिज परिवाराच्या सहकार्याने आयोजित मोफत हृद्यरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी महापौर शेंडगे बोलत होत्या. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विक्रम राठोड, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संतोष गेनप्पा, दत्ता कावरे, दिलीप सातपुते, दत्ता जाधव, सतीश लोढा, गणेश कांकरिया, डॉ. आनंद छाजेड, ममता छाजेड, सुनिल छाजेड, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वसंत कटारिया, प्रकाश छल्लाणी, डॉ. आशिष भंडारी, डॉ. राहुल अग्रवाल, डॉ. अमित थोपटे, डॉ. विनय छल्लाणी, पारुनाथ ढोकळे आदींसह जैन सोशल फेडरेशनचे सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. वसंत कटारिया म्हणाले की, देशाच्या कानाकोपर्यातून रुग्ण येथे हृद्ययाच्या शस्त्रक्रियेसाठी येतात. हॉस्पिटलमध्ये असलेल्या अद्यावत, सुसज्ज कार्डियाक सेंटर, कॅथ लॅब व अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून 30 हजार पेक्षा जास्त बायपास सर्जरी तर 50 हजार एन्जोप्लास्टी करण्यात आलेल्या आहेत. बायपास, वॉल रिप्लेसमेंट, ह्रद्यरोग, जन्मजात दोष, ह्रद्याचे छिद्र बुजविणे व लहान मुलांच्या ह्रद्याच्या गुंतागुंतीच्या अवघड शस्त्रक्रिया अल्पदरात करण्यात येते. तर महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत ह्रद्य शस्त्रक्रिया मोफत केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. प्रकाश कांकरिया यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन मागील 22 वर्षापासून आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरु आहे. मोफत आरोग्य शिबिर घेऊन शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोचविण्याचे कार्य केले जात आहे. पंधरा ते सोळा वर्षांपूर्वी बायपास सर्जरीला मोठ्या शहरात 5 लाख खर्च यायचा, त्या दर्जाची शस्त्रक्रिया 50 हजारात उपलब्ध केल्याने हॉस्पिटल देशात नावरुपाला आल्याचे त्यांनी सांगितले.
शांताबाई छाजेड यांनी आनंदऋषीजींच्या आशिर्वादाने रुग्णसेवा करण्याची संधी मिळाली, हे आम्ही आमचे भाग्य समजतो. आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मानवसेवेच्या कार्यासाठी छाजेड परिवाराचे नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले की, संतांच्या विचाराने आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णसेवा करीत आहे. हे हॉस्पिटल गोरगरिबांसाठी नवजीवन देणारा ठरला आहे. माणुसकीचे भान ठेऊन सर्वसामान्यांना आरोग्यसेवेच्या रुपाने आधार दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उपस्थित पाहुण्यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या उभारणी काळापासून माजी आमदार स्व. अनिल राठोड यांनी दिलेले योगदान व अनेक अडचणीत हॉस्पिटलच्या मागे ठाम उभे राहून दिलेली साथ, याबाबत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या शिबीरात 247 रुग्णांची मोफत हृद्य तपासणी करण्यात आली. यामध्ये गरजेनुसार रुग्णांची बायपास, अॅन्जिओप्लास्टी, अॅन्जिओग्राफी, बीएमव्ही व हृद्यातील झडप बदलण्याची शस्त्रक्रिया अत्यल्पदरात केल्या जाणार आहेत. तसेच महात्मा फुले ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत या हृद्य शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी जैन सोशल फेडरेशनचे सदस्य व आनंदऋषीजी हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.