वन विभागाच्या त्या अधिकार्याचे निलंबन करुन, मजुरी मिळण्याची मागणी
भाकप व किसान सभेचे वन विभाग समोर उपोषण
अहमदनगर (प्रतिनिधी)- आदिवासी मजुरांना कामावर बोलवून त्यांची तब्बल 17 लाख रुपयांची मजूरी हडप करणार्या वन विभागातील त्या अधिकार्याचे निलंबन करुन, मजुरांनी केलेल्या श्रमाचे पैसे मिळण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने नगर-औरंगाबाद येथील वन विभागाच्या कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. या उपोषणात सहभागी झालेल्या आदिवासी मजुरांनी केलेल्या कामाचा मोबदला मिळण्यासाठी जोरदार निदर्शने करुन उपवनसंरक्षक अधिकारींच्या दालनाबाहेर ठिय्या दिला. यावेळी भाकपचे राज्य सहसचिव कॉ. सुभाष लांडे, भैरवनाथ वाकळे, प्रकाश कोकाटे, गजानन डाखोरे, दत्ता घाटे, गणपत पिंपरे, ज्ञानेश्वर फुकाटे, ज्ञानदेव तनपुरे, सुभाष जामकर, माणिक इंगळे, विठ्ठल फुफाटे, रेणुका डाखोरे, लताबाई लाखाडे, नंदा कोकाटे, लक्ष्मी मोहिते, पल्लवी मोहिते, संतोष गायकवाड, चंद्रकांत माळी आदी उपस्थित होते.
वाशिम येथील आंध या आदिवासी समुदायातील तीस मजुरांना विक्रम बुरांडे नावाच्या सामाजिक वनीकरण खात्याच्या अधिकार्याने श्रीगोंदा तालुक्यातील येळपणा सी.सी.टी. प्रकारच्या (खोदाई) कामासाठी आनले होते. एप्रिल 2021 मध्ये या मजुरांना कामावर नेऊन, सरकारी दराने मजुरी देण्याचे कबुल केले. यानंतर मजुरांकडून प्रत्यक्ष काम करुन घेतले.
कामाच्या साइटवर स्थलांतरित मजुरांसाठी निवास, पाळणाघर, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, शौचालय इत्यादी कोणत्याही सुविधा सामाजिक वनीकरण विभागाने पुरवल्या नाहीत. येळपणा येथील काम झाल्यानंतर या मजुरांना पिसोरा येथे नेऊन त्यांच्याकडून सी.सी.टी. ची कामे करुन घेतली. जून 2021 पर्यंत हे काम सुरु होते. बुरांडे नावाच्या अधिकार्याने मजुरांना केवळ आठवडी बाजारासाठी उचल दिली. मजुरीचे शिल्लक पैसे मजुरांनी मागू नये, यासाठी काम पूर्ण झाल्यानंतर गावातील काही व्यक्तींना हाताशी धरुन स्थलांतरित मजुरांवर चोरीचा आळा घालण्याचा प्रयत्न केला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
पैश्याची मागणी लाऊन धरली असता, 24 सप्टेंबर 2021 रोजी हिशोबासाठी नगर- औरंगाबाद महामार्गावरील सनी लॉज येथे बोलावून घेण्यात आले. विक्रम बुरांडे याच्यासह वनीकरण खात्यातील एक अधिकारी व काही गुंड होते. त्यांनी मजुरी घेण्यासाठी आलेल्या प्रकाश कोकाटे यास मारहाण करुन कोर्या कागदावर सह्या घेतल्या. या प्रकारे वन विभागातील बुरांडे या अधिकार्यांने मजुरीचे 17 लाख रुपये हडप करुन दहशत निर्माण केल्याचा आरोप आदिवासी मजुरांनी केला आहे.
आदिवासी मजुरांची पिळवणूक करून आत्याचार करणार्या विक्रम बुरांडे व त्याच्या साथीदारविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करुन, या भ्रष्टाचाराची चौकशी करुन त्यांचे निलंबन करावे, एप्रिल ते 30 जून 2021 कालावधीत येळपणा, पिसोरा (ता. श्रीगोंदा) येथे केलेल्या सिसिटी कामाची थकीत मजुरी तात्काळ अदा करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन उपवनसंरक्षक अधिकारी सुवर्णा माने व श्रीगोंदाचे वन अधिकारी यांना देऊन चर्चा करण्यात आली. त्यांनी दहा दिवसात चौकशी करुन, यावर निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.