तासनतास स्क्रिन पुढे असलेल्या मुलांच्या दृष्टीकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज -पद्मश्री पोपट पवार
अहमदनगर (प्रतिनिधी)- अत्यंत कमी वयात मुलांना डोळ्याचे विकार जडत असून, पालकांनी मुलांच्या दृष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. संगणक व मोबाईलच्या युगात मुले तासनतास स्क्रिन पुढे असतात. यामुळे लहान वयातच दृष्टीदोष निर्माण होत आहेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे. प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांचे दृष्टीदोष दूर करण्यासाठी हा उपक्रम राबविण्याचे आवाहन पद्मश्री पोपट पवार यांनी केले.
आदर्शगाव हिवरे बाजार (ता. नगर) येथील शालेय विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. पद्मश्री पोपट पवार यांच्या मातोश्री कै. जानकाबाई बागुजी पवार यांच्या स्मृतीदिनानिमित्त शहरातील स्वस्तिक नेत्रालय व मॅटर्निटी हॉस्पिटलच्या वतीने राबविण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी पद्मश्री पवार बोलत होते. यावेळी स्वस्तिक नेत्रालयाचे संचालक डॉ. प्रफुल चौधरी, डॉ. कल्याणी चौधरी, गोरक्षनाथ बहिरट, ज्ञानेश्वर लंके, योग गुरु सागर पवार, कविता कर्नावट, मोहसीन सय्यद, सागर गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे पद्मश्री पवार म्हणाले की, आईच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध शिबीर राबविण्यात येतात. या वर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणीचे शिबीर घेण्यात आले. या शिबीरात 400 शालेय विद्यार्थ्यांची व काही ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली असून, या शिबीरात 50 दृष्टीदोष असलेली मुले आढळली आहे. त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबीरास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी भेट देऊन शालेय विद्यार्थ्यांचे दृष्टीदोष करण्याच्या उद्देशाने व डोळ्याची निगा राखण्यासाठी घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. डॉ. प्रफुल चौधरी म्हणाले की, मुलांचे पुढील भविष्य नेत्रावरती अवलंबून आहे. दृष्टी चांगली असल्यास मुले अभ्यासासह विविध क्षेत्रात पुढे जाऊ शकतात. दृष्टीदोष असलेल्या मुलांना शिक्षणाबरोबर इतर ठिकाणी अडचणी निर्माण होतात. मुलांना दृष्टीदोष असल्याचे कळत नाही, याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांची दृष्टी चांगली असल्यास ते आपली प्रगती साधू शकणार असल्याचे स्पष्ट करुन, प्रत्येक शाळेत हे शिबिर राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.