महिला ही कुटुंबाचा कणा – बलभीम कराळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला ही कुटुंबाचा कणा आहे. महिलांनी आरोग्याबाबत जागृक राहिल्यास कुटुंबाचे आरोग्य तिच्याकडून जपले जाते. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. शिबिरांच्या माध्यमातून आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहचत आहे. कोरोनाकाळात महिला डॉक्टर, परिचारिका यांनी लढा देऊन अनेकांचे जीव वाचवले असल्याचे प्रतिपादन आगडगाव येथील काळभैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष बलभीम कराळे यांनी केले.
नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत युवक कल्याण योजनेमार्फत उडाण फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आगडगाव (ता. नगर) येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी कराळे बोलत होते. यावेळी देवस्थानचे व्यवस्थापक नामदेव कराळे, दिलीपकुमार गुगळे, ग्रामविकास अधिकारी खाडे, निर्मला बोरुडे, भागुजी कराळे, साहेबराव गायकवाड, अॅड. ह.भ.प. सुनिल तोडकर, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, डॉ. अमित पिल्ले, सचिन सोनवणे, उडाण फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंदे, भारती शिंदे आदी उपस्थित होते.
या शिबिरात महिलांची नेत्र व दंत तपासणीसह महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच कोरोना काळात उत्कृष्ट आरोग्य सेवेचे कार्य करणारे आशा स्वयंसेविका रंजना थोरात, वैशाली शिंदे, लंका कराळे, मीरा साळुंके, सुनिता कराळे आदींना पुस्तके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
आरती शिंदे म्हणाल्या की, महिलांनी कर्तृत्व गाजवून शत्रूंशी लढा दिल्याचा इतिहास आहे. याची पुनरावृत्ती कोरोना काळात झाली. आरोग्य क्षेत्रात काम करणार्या अनेक महिलांनी जीवाची बाजी लाऊन अनेकांना जीवनदान दिले. छत्रपती शिवाजी महाराज घडविणारे राजमाता जिजाऊ ते राणी लक्ष्मीबाई तर स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणार्या सावित्रीबाई यांचा इतिहास या मातीशी जोडला गेलेला आहे. हाच वारसा पुढे चालवून महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवकांनी मतदार म्हणून नोंदणी केली पाहिजे. शंभर टक्के मतदानासाठी यावेळी मतदार जागृती करण्यात आली. या उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक शिवाजी खरात, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, जय असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. महेश शिंदे, पोपट बनकर, अॅड. अनिता दिघे आदींचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप वाघुले, शुभम शिंदे, आजिनाथ पागिरे, सागर शिंदे, राधा कराळे, पल्लवी कन्हेरकर, सतीश बनसोडे आदींनी परिश्रम घेतले. आभार अक्षय शिंदे यांनी मानले.