प्रलंबीत प्रश्नांची सोडवणूकहोत नसल्याने माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे
सर्व प्रश्नांचा खुलासा करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबीत प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने यासंदर्भात खुलासा करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद येथील माध्यमिक शिक्षण विभागासमोर शुक्रवारी (दि.2 ऑगस्ट) धरणे आंदोलन करण्यात आले. निवेदन घेण्यासाठी अधिकारी उपलब्ध नसल्याने संतप्त आंदोलक शिक्षकांनी शिक्षणाधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीस फुलांचा हार घालून गांधीगिरी केली. तर रिकाम्या खुर्चीवर मागण्यांचे निवेदन ठेवण्यात आले.
जिल्ह्यात शिक्षक-शिक्षकेतरांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, अनेक वेळा भेटून चर्चा करून प्रश्नासंदर्भात निपटारा झाला नसून, या सर्व प्रश्नांसाठी माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नासाठी शिक्षकांनी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, सरचिटणीस आप्पासाहेब शिंदे, फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष चांगदेव कडू, माजी जिल्हाध्यक्ष एम.एस. लगड, विजय थोरात, हरिचंद्र नलगे, राजेंद्र खेडकर, आत्माराम दहिफळे, महेंद्र हिंगे, प्रशांत होन, बद्रीनाथ शिंदे, दिलीप ढवळे, सुधीर काळे, एन.जी. देशमाने, देवीदास पालवे, नंदकुमार शितोळे आदींसह शिक्षक सहभागी झाले होते.
सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये पीएफ खात्यामध्ये जमा झाला असून, आपल्या जिल्ह्यामध्ये अजूनही काही तालुक्यात जमा झालेला नाही. मेडिकल बिले काही शिक्षक शिक्षकेतरांना प्राप्त झाली परंतु, अजूनही अनेकशिक्षकांची बिले येणे बाकी आहेत. फरक बिले अजूनही प्राप्त झालेले नाही, त्याबाबत काय कारवाई झाली? निवृत्त शिक्षकांची फरक बिले, आपल्या कार्यालयाकडे जमा झालेली आहे. ती संबंधित शिक्षक शिक्षकेतरांना कधी प्राप्त होतील?
दप्तर दिरंगाई बाबत अनेकवेळा तक्रारी करुन त्याबाबत योग्य निर्णय घेतला जात नाही. तीन महिन्यापूर्वी लेखी पत्र देऊन तसेच तोंडी मागणी करून पगार बिलाचे स्क्रोल अद्याप पर्यंत प्राप्त झालेले नाही. पे युनिटमधील अनागोंदी कारभारावर अनेक वेळा चर्चा होऊनही बदल होत नाही. मागील आंदोलनात कार्यालयासमोर फलक लावण्या संदर्भात चर्चा झाली, परंतु कर्मचारी भेटी संदर्भात अद्यापही फलक लावण्यात आलेले नाही. या सर्व प्रश्नांचा खुलासा करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. तर सेवानिवृत्त व मयत शिक्षक, कर्मचार्यांना पहिला, दुसरा व तीसरा हप्ता रोखीने देण्याची मागणी करण्यात आली आहे.