ज्युनियर वकीलांना कायदेविषयक सल्ला देऊन वकिली क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दलचा बहुमान
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ ज्युनियर वकीलांना कायदेविषयक सल्ला देऊन वकिली क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल अहमदनगर वकील संघाच्या वतीने अॅड. भाऊ औसरकर व अॅड. नरेश गुगळे यांना लिगल हेल्प टँक बहुमानाने सन्मानित करण्यात आले. तसेच कोरोनात मरण पावलेल्या अॅड. नरगाळे यांच्या कुटुंबीयांना अॅड. नरेश गुगळे यांनी वीस हजार रुपयाची आर्थिक मदत दिली. जिल्हा न्यायालयातील बार रुममध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अनिल सरोदे, अॅड. कारभारी गवळी, अॅड. सुभाष दहिफळे, अॅड. अमोल धोंडे, अॅड. रामदास सूर्यवंशी, अॅड. संदीप म्हस्के, अॅड. रफिक बेग, अॅड. अनुजा काटे, अॅड. साहेबराव चौधरी, अॅड. शशिकांत पाठक, अॅड. दिलीप घोलप, अॅड. राजेंद्र शेलोत, अॅड.राजाराम हराळ, अॅड. संदीप खांदवे, अॅड. वाय.बी. बोरा, अॅड. एन.के. गर्जे आदींसह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अॅड. अनिल सरोदे म्हणाले की, ज्युनियर वकीलांना कायदेविषयक सल्ला देऊन अॅड. औसरकर व अॅड. गुगळे यांनी त्यांच्या अडचणी दूर केल्या. ज्युनियर वकीलांना कायद्यातील सर्व बाबी माहीत असतीलच असे नसते. त्यामुळे ते गोंधळून जातात. इतर वकील ज्युनियर वकिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन, त्यांचे मॅटर पळवतात. त्यामुळे ज्युनियर वकील हताश होतात. पहिल्या काही वर्षांत आर्थिक अडचणी तसेच पक्षकारांचे प्रकरणे मार्गी लावताना मोठा ताण तयार होतो. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ज्युनियर वकीलांना निस्वार्थ भावनेने मदत केली. या कार्याचा सन्मान म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. नरेश गुगळे यांनी येत्या जून मध्ये वकील संघातील सर्व वकीलांना एक केशर आंब्याचे कलम रोपं देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण होऊन पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. अॅड. भाऊ औसरकर यांनी सत्काराला उत्तर देताना कर्तव्य म्हणून ज्युनियर वकीलांना कायदेविषयक मदत केली असून, कोणत्याही प्रकारे सत्काराची अपेक्षा ठेवली नसल्याचे सांगितले.
अॅड. कारभारी गवळी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक सिनियर वकिलाने किमान पाच ज्युनियर वकिलांना आपल्या चेंबरमध्ये काम करण्याची संधी द्यावी. त्यामुळे ज्युनियर वकिलांना काम मिळून त्यांना त्यांचे कौशल्य दाखवता येणार आहे. त्यातून त्यांचे आर्थिक प्रश्न देखील सुटू शकतील. प्रत्येक वकील संघाने ज्युनियर वकिलांना कायदेविषयक मदत केली पाहिजे. कायदा हा समुद्रापेक्षा व्यापक असून, कोणत्याही एका व्यक्तीला कायद्याच्या सर्वच बाबतीत प्राविण्य प्राप्त करता येत नाही. त्यामुळे वकील संघ हे कुटुंब असून, नव्या वकिलांना कायदेविषयक अडचणी दूर करण्यात योगदान देणार असल्याचे मत मांडले.