जायंट्स ग्रुपच्या दमण येथील आंतरराष्ट्रीय संमेलनात सामाजिक कार्याचा नगरी डंका
अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंट्स ग्रुपच्या आंतरराष्ट्रीय संमेलनात अहमदनगर जायंट्स ग्रुपला उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. दमण येथे नुकतेच पार पडलेल्या जायंट्सच्या आंतरराष्ट्रीय संमेलनात दिव-दमण, दादर नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, खासदार लालूभाई पटेल, जायंट्स इंटरनॅशनलचे विजय चौधरी, अध्यक्ष एन.सी. शायना यांच्या हस्ते जायंट्स वेलफेयर फाऊंडेशनचे सदस्य संजय गुगळे यांना पुरस्कार देण्यात आले.
गेल्या 35 वर्षांपासून शहरात अहमदनगर जायंट्स ग्रुप कार्यरत आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आरोग्य क्षेत्रात ग्रुपच्या वतीने सामाजिक योगदान दिले जात असून, वंचित घटकांना आधार दिला जात आहे. ग्रुपच्या वतीने सातत्याने गरजू घटकांसाठी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, जनावराची आरोग्य तपासणी, गरजूंना मोफत औषध व उपचार, कॅन्सर विषयक जनजागृती सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन ग्रुपला राज्यस्तरीय तर सांगली, कोल्हापूर पूरग्रस्त भागात जाऊन केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून व करोना काळामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांना जायंट्स ग्रुपच्या सदस्यनी केलेली मदत, पायी प्रवास करणार्याला सायकलचे वाटप, अनेक आरोग्य परिचारिका याना किराणा वाटप अश्या कठीण प्रसंगी केलेल्या कार्यामुळे आंतरराष्ट्रीय पारितोषिक प्रदान करण्यात आले.
दमण येथे झालेल्या अधिवेशनात ग्रुपच्या शहर अध्यक्षा विद्या तन्वर, डॉ. विनय शहा, नुतन गुगळे, नयना शहा, जायंट्सचे माजी अध्यक्ष अर्बन बँकेचे चेअरमन राजेंद्र अग्रवाल, सुरेखा अग्रवाल, चिंकिता अग्रवाल आदी सदस्य उपस्थित होते. अहमदनगर जायंट्स ग्रुपच्या सामाजिक कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.