शिवराईमुळे शिवछत्रपतींचा इतिहास समोर येण्यास मदत -डॉ. रवींद्र साताळकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवराई, होण या नाण्यांच्या अभ्यासाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समोर येण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रात शिवराईचे अडीचशे हून अधिक प्रकार पाहावयास मिळतात. याचा अभ्यास करून त्याचा इतिहास अभ्यासकांसमोर आणण्याचे काम शिवराईप्रेमी करत आहेत. या संशोधन कार्यात अहमदनगर ऐतिहासिक वस्तु संग्रहालयचे नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे प्रतिपादन डॉ. रवींद्र साताळकर यांनी केले.
अहमदनगर ऐतिहासिक वस्तु संग्रहालय व संशोधन केंद्राच्या वतीने एक दिवसीय शिवराई कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. साताळकर बोलत होते. कार्यशाळेसाठी बस्तीमल सोलंकी व किशोर चंडक प्रमुख पाहुणे म्हणून तर पुरुषोत्तम भार्गवे, पोपटलाल हळपावत, भूषण देशमुख, सचिन डागा, संजय दळवी, बालाजी वल्लाळ, पंकज मेहेर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. साताळकर यांनी वस्तु संग्रहालय संशोधन केंद्रासाठी टिळक महाविद्यालय व पुणे विद्यापीठाकडून मान्यता घेण्याचे कार्य सुरु असल्याचे सांगून, त्यांनी शहरात इतिहास संशोधन करणार्या व्यक्तींसाठी दिला जाणारा आबासाहेब मुजुमदार पुरस्कार व वस्तु संग्रहालयाच्या वतीने जुन्या पुस्तकांचे डिजिटलायझेशनच्या कामाची माहिती दिली.
कार्यशाळेच्या प्रारंभी ऐतिहासिक वस्तु संग्रहालय येथील शहाजीराजे भोसले व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. या कार्यशाळेत महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यातून 40 अभ्यासक सहभागी झाले होते.
बस्तीमल सोलंकी म्हणाले की, ऐतिहासिक अहमदनगर शहरात शिवराई कार्यशाळेचे आयोजन होणे, ही सर्व अभ्यासकांसाठी मोठी पर्वणी आहे. सर्व अभ्यासकांनी पेपरवर लिहून प्रेझेंटेशन केले पाहिजे. सोशल मीडियावर लिहिण्यापेक्षा नोंद करून विविध विषय चर्चेला गेल्यास शंकाचे निरसन होऊन व्यवस्थित माहिती सर्वांसमोर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर पुढील संमेलन पुणे येथे शैलेंद्र भंडारे यांना विशेष आमंत्रित करुन केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
किशोर चंडक म्हणाले की, शिवराई या विषयावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी या कार्यशाळा आयोजित होणे खूप गरजेचे आहे. शिवराईचा प्रत्यक्ष वापर यात अनेक मतमतांतरे आहेत. नवीन संशोधकांसाठी यावर अधिक अभ्यास करून इतिहास समोर आणता येणार आहे. शिवाजी महाराज या व्यक्तिमत्त्वाचा परीपुर्ण अभ्यास होण्यासाठी व इतिहास जाणून घेताना शिवराई या पैलूंचा उलगडा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेत अमोल बनकर यांनी शिवराईचा मागोवा, अंकुश देवरे यांनी मराठी नाणी प्रोजेक्ट, पुरुषोत्तम भार्गवे यांनी इस्टइंडिया कंपनी आणि शिवराई, किशोर चंडक यांनी शिवराई आणि शिवराईची वजने, पोपटलाल हळपावत यांनी छत्रपतींच्या शिवराईवरील चिन्हे याबद्दल पेपर वाचन करुन अधिक माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचे स्वागत डॉ. संतोष यादव यांनी केले. कार्यशाळेचे प्रमुख नियोजन पोपटलाल हळपावत व डॉ. संतोष यादव यांनी केले होते. यामध्ये आनंद कल्याण बापू मोढवे, राहुल भोर, गणेश रणसिंग, रामदास ससे यांनी सहभाग घेतला होता.