राधा व श्रीकृष्णच्या वेशभुषेतील चिमुकल्यांचा कृष्णलीलेवर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दहीहंडी सोहळा शुक्रवारी (दि.19 ऑगस्ट) सकाळी उत्साहात पार पडला. प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी एकावर एक थर रचून दहीहंडी फोडली.
या सोहळ्यासाठी चिमुकले राधा व श्रीकृष्णच्या वेशभुषेत दाखल झाले होते. श्रीकृष्णाच्या वेशभुषेत असलेल्या विद्यार्थ्याने हदीहंडी फोडत हा उत्सव जल्लोषात साजरा केला. हाथी घोडा पालखी.. जय कन्हैया लाल की! च्या जयघोषाने शाळेचा परिसर दणाणला.
प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर भाबड, उपमुख्यध्यापिका कविता सुरतवाला व सर्व विभाग प्रमुख यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. संगीतच्या शिक्षिका रेणुका पुरंदरे यांनी विद्यार्थ्यांसह भजन सादर केले.
विद्यार्थिनींनी कृष्णाष्टकम या भजनावर बहारदार नृत्याचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बाळकृष्ण माखनचोर या नाटिकेने कार्यक्रमाची रंगत वाढवली. प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी कृष्णलोरी गायली. तर श्रीकृष्ण अर्जुनाला भगवतगीता सांगतानाचे उत्कृष्ट सादरीकरण करुन कृष्णलीलेवर नृत्य सादर केले.
प्रितम जाधव व सुनिल जार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. यावेळी माध्यमिकचे संध्या बोरसे, रुपाली काळे, उन्नती नगरकर, रुपाली घोरपडे, प्राथमिकचे सपना सांगळे, सुवर्णा मलमकर, संगीता वंगा, आकाश थोरात, मंजिरी देशपांडे आदींसह शालेय शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरा गोंधळी व वेदांत शेळके या विद्यार्थ्यांनी केले.