अमृतमहोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ
अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो.च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अमृतमहोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी पार पडला. शहरात काढण्यात आलेल्या प्रभात फेरीत स्वातंत्र्य संग्रामातील नेते, महात्मे व बलिदान देणारे क्रांतिकारकांच्या वेशभूषेत अवतरलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. वंदे मातरम… भारत माता की जय… च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. तर विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ देण्यात आली.
प्राचार्य प्रभाकर भाबड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्कूल कमिटीचे चेअरमन अॅड. गौरव मिरीकर, उपमुख्याध्यापिका कविता सुरतवाला, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख कांचन कुमार, इयत्ता पाचवी ते सातवीच्या विभागप्रमुख रेखा शर्मा, माध्यमिक विभागप्रमुख वैशाली वाघ, उच्च माध्यमिक विभागप्रमुख आश्विनी रायजादे आदींसह विद्यार्थी, शालेय शिक्षक व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बॅण्डपथकासह विद्यार्थ्यांनी शिस्तबध्द संचलन करुन राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्ती गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. उठो जवानो आपको वसुंधरा पुकारती… या गीताने कार्यक्रमात स्फुर्ती निर्माण केली. तर कर चले हम फिदा जानो तन साथियो… या गितांनी अंगावर शहारे आणले. शाळेच्या विविध कार्यक्रमानंतर शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली होती.
कविता सुरतवाला यांनी स्वातंत्र्यपूर्व भारत ते स्वातंत्र्योत्तर आणि अमृतमहोत्सवातून महासत्तेच्या दिशेने भारताची वाटचाल यावर मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रभाकर भाबड यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे सर्वांना शुभेच्छा देऊन मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व विशद करुन विद्यार्थ्यांना कर्तव्याची जाणीव करुन दिली.
क्रीडा शिक्षक प्रीतम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संचलन करुन भारत मातेचा जयघोष केला. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया व खजिनदार प्रकाश गांधी यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी ईशान बल्लाळ आणि विद्यार्थिनी प्रमुख मुग्धा कुलकर्णी यांनी केले. क्रीडा शिक्षक आकाश थोरात यांनी आभार मानले.