अन्याय निवारण कृती समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
दोन कर्ते मुले मयत झालेल्या दाम्पत्यांची सावकाराच्या तावडीतून शेत जमीन वाचविण्यासाठी धडपड
अहमदनगर (प्रतिनिधी)- अशिक्षित असलेल्या वृध्द दाम्पत्यांची शेत जमीन बळकावणार्या शहरातील सावकारावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी समितीचे राज्य अध्यक्ष मोहन ठोंबे, राज्य सचिव प्रा. पंकज लोखंडे, जितेंद्र ठोंबे, युसूफ शेख, विजय जाधव, विजय दुबे, पिडीत वृध्द दांम्पत्य असाराम ठोंबे, लताबाई ठोंबे, शारदा साळवे, नितीन साठे, जावेद सय्यद आदी उपस्थित होते.
नगर तालुक्यातील मौजे खांडके येथे आसाराम ठोंबे व लता ठोंबे या वृध्द दाम्पत्याची गट नंबर 123 मध्ये 50 आर वडिलोपार्जीत शेत जमीन आहे. ठोंबे यांनी घरगुती अडचणीमुळे शहरातील मार्केटयार्डमध्ये व्यापारी असलेल्या एका सावकाराकडे सदर शेत जमीन सन 2016 मध्ये 11 लाख रुपयात गहाण ठेवली होती. त्या सावकाराने कच्ची खरेदी करून घेतो असे म्हणून, वृध्द दांम्पत्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन पक्की खरेदी करून त्यांची फसवणूक केली. सदरील सावकाराने जमिनीवर त्यांच्या मुलांचे नाव वारस म्हणून नोंद केले आहे. जमिनीवर वृद्ध दाम्पत्यांचा अनेक वर्षापासून ताबा आहे. त्यांनी कर्जाने घेतलेली रक्कम व्याजासह सावकाराला परत केलेली असून, सदर सावकार जमीन पुन्हा नावावर करुन देण्यास तयार नाही. या सावकाराने जमीन विक्रीस काढली असून, त्याची मुले ग्राहकांना जमीन दाखविण्यास घेऊन येत आहे. विक्री करण्यास विरोध दर्शवला असता, सावकाराची मुले धमकावत असल्याचा आरोप आसाराम व लता ठोंबे या वृध्द दांम्पत्यांनी केला आहे.
वृध्द दांम्पत्यांची दोन्ही मुले मयत झाली असून, या वृध्द दांम्पत्यांचे शेती व कबाडकष्टकरुन उदरनिर्वाह चालत आहे. त्यांची वडिलोपार्जीत जमीन त्यांना परत मिळावी व शेत जमीन बळकावणार्या सावकारावर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
सहा एकर जमीन गहाण ठेऊन 11 लाख रुपये शहरातील एका सावकाराकडून घेतले होते. त्यापोटी त्याला 32 लाख टप्प्याटप्प्याने त्याला परत देण्यात आले. काही रक्कम बँक खाते तर काही रक्कम साक्षीदारांच्या समक्ष देण्यात आली. मात्र सावकाराने जमीन नावावर करुन त्याची खेरेदी काढली आहे. एका मुलाचा खून तर एका मुलाचा जेलमध्ये मृत्यू झाला. कुटुंबातील दोन्ही कर्ते मुले गेल्याने शेतीवरच उदरनिर्वाह चालत असून, तीही हातातून गेल्यास रस्त्यावर येण्याची वेळ येणार असून, याप्रकरणी न्याय मिळावा. -लताबाई ठोंबे