महापुरुष व भारतरत्न पुरस्काराने सन्मानित व्यक्तींच्या रेखाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलचे व गणवेशचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालय व प्राचार्य बत्तीन पोट्यंना प्राथमिक शाळेत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणार्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी अमृत महोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत देशातील महापुरुष व भारतरत्न पुरस्काराने सन्मानित व्यक्तींच्या रेखाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप व गणवेशासाठी आर्थिक मदत देऊन सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
प्रारंभी तिरंगा ध्वज फडकवून देशभक्तीवर कार्यक्रम पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. वसंतराव दिकोंडा, नगरसेवक प्रदीप (भैय्या) परदेशी, पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या सचिव रत्नाताई बल्लाळ, विश्वस्त राजूशेठ म्याना, जितेंद्र वल्लाकट्टी, महेंद्र बिज्जा, सागर बोगा, विठ्ठल बुलबुले, दीपक गुंडू, वैशाली नराल, सुरेखा विद्ये, विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक रामदिन, उपमुख्याध्यापक पांडुरंग गोणे, पर्यवेक्षिका सरोजनी रच्चा, शिक्षक प्रतिनिधी प्रा. भानुदास बेरड, ज्युनियर कॉलेजचे समन्वयक प्रा. उत्तम लांडगे, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल आदींसह नगर जल्लोष, पदमशाली युवाशक्ती, पदमशाली स्नेहिता संघम, कस्तुरबा महिला प्रतिष्ठान, पद्मशाली महिला शक्तीचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात दिपक रामदिन यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करुन, शताब्दी वर्षाकडे वाटचाल करताना समाज व देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. देशप्रेमातून राष्ट्र विकास साधला जाणार असून, राष्ट्रनिर्माणासाठी भावीपिढी सुशिक्षित व सुसंस्कारी घडविण्यासाठी मार्कंडेय विद्यालय प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बॅण्ड पथकाच्या निनादात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. स्काऊटगाईड मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीत सादर केली. ऐ वतन, मेरे वतन आबाद रहे तू!… या गीताने कार्यक्रमाची रंगत वाढवली. भारत माता की जय… च्या घोषणा देत सादर करण्यात आलेल्या लेझीम व दांडिया नृत्याद्वारे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले.
नगर जल्लोष तर्फे विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलचे वाटप करण्यात आले. पद्मशाली फाऊंडेशनच्या वतीने प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेशासाठी आर्थिक मदत देण्यात आली. ज्येष्ठ कलाध्यापक नंदकुमार यन्नम यांनी महापुरुष व 12 भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे आपल्या कुंचल्यातून रेखाटलेले चित्र व इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वास्तू व देशभक्तीवर आधारीत काढलेल्या चित्रप्रदर्शनाच्या कलादालनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिकेत पाठपुरावा करुन मार्कंडेय देवस्थान व विद्यालयाची भाडेपट्टी (कर) माफी करुन दिल्याबद्दल अजय लयचेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल विष्णू रंगा यांनी केले. आभार श्रीनिवास मुत्त्याल यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिकचे सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर यांनी परिश्रम घेतले.