जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
अमृत जवान सन्मान अभियानाचे प्रणेते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे सैनिक परिवारांच्या वतीने आभार
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक व शहिद परिवाराचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरु करण्यात आलेले अमृत जवान सन्मान कक्ष कायमस्वरूपी सुरु ठेवण्याची मागणी माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी जय हिंदचे शिवाजी पालवे, भाऊसाहेब कर्पे, शिवाजी गर्जे, निवृत्ती भाबड, संजय डोंगरे, दुशांत घुले, सचिन दहिफळे, बन्सी दारकुंडे, भाऊसाहेब देशमाने, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक व शहिद परिवाराचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अमृत जवान कक्ष सुरू केले. याद्वारे अनेक आजी-माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय व शहीद परिवाराचे प्रश्न निकाली काढून अमृत जवान सन्मान अभियान राबविले. हे अभियान राज्य सरकारने नगर पॅटर्न म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात राबवले असून, या अभियानाचे प्रणेते जिल्हाधिकारी भोसले यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या अभियानामुळे हजारो आजी-माजी सैनिकांच्या अडी-अडचणी दूर झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
येणार्या काळात आजी-माजी सैनिक बांधवांना अडचण होऊ नये, अमृत जवान सन्मान कक्ष सुरु राहणे अपेक्षित आहे. महिन्यातून एक दिवस सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून कक्ष कार्यान्वीत ठेवण्याची मागणी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. तर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आजी-माजी सैनिक व शहिद परिवाराचे प्रश्न सोडवण्यासाठी राबविण्यात आलेल्या अमृत जवान सन्मान अभियानाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांचे जिल्ह्यातील सर्व सैनिक परिवारांच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.