लोकशाही राबविण्यासाठी जय शिवाजी, जय डिच्चू कावा मोहिम कार्यान्वीत -अॅड. गवळी
अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका हद्दीमध्ये उखडलेले रस्ते, पिण्याच्या पाण्यासंदर्भातील अनागोंदी आणि महापालिकेचा भ्रष्टाचार आणि ढिसाळ कारभारामुळे अहमदनगरच्या नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आला आहे. भ्रष्टाचार विरोधातील लढा मोर्चे आणि उपोषणाने जिंकता येणार नसून, प्रत्येक जागृक नागरिकांच्या सहभागातून क्रांती घडवता येणार आहे. प्रत्येक मतदार हसरा करण्यासाठी महापालिका हद्दीत खर्या अर्थाने लोकशाही राबविण्यासाठी जय शिवाजी, जय डिच्चू कावा मोहिम कार्यान्वीत करण्यात आली असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
मतदारांना सक्तीने दिलेले पैसे, मटन, कोंबडी सहज पचवता येणार आहे. परंतु मतदारांना विकत घेणारा लोकप्रतिनिधी हा देश विकणारा आहे. ही भूमिका ठेवून अशा उमेदवाराविरुद्ध डिच्चू कावा करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. बदल घडविण्यासाठी डिच्चू कावा शिवाय पर्याय नाही, धर्म आणि जातीच्या नावावर मते मागणारे गुट्टलबाज आहेत, ही खूणगाठ मतदारांच्या मनामध्ये निर्माण करण्याची गरज आहे. मतदारांच्या मनावर गुट्टलबाज सत्ता पेंढार्यांचा कावा बिंबवला पाहिजे त्यातून क्रांती घडणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
एक किंवा हजारो भ्रष्टाचार विरोधातील आंदोलनं, मोर्चे आणि उपोषणाने लोकशाही वाचू शकणार नाही. मतदारांचे काहीएक नुकसान न होता त्यांना क्रांती घडवून आणता येणार आहे. स्वातंत्र्याच्या पंच्यात्तर वर्षात न मिळालेले स्वातंत्र्याचे फायदे नक्की मिळण्याची संधी या नव्या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होणार आहे. त्यासाठीच ऑपरेशन पर्यायसुद्धा राबविण्याची गरज आहे. संपूर्ण देशातील मतदारांसमोर अहमदनगरच्या नागरिकांनी आदर्श निर्माण करण्यासाठी जय शिवाजी, जय डिच्चू कावा या तंत्राचा वापर सुरू ठेवण्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या मोहिमेसाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, पै. नाना डोंगरे, जालिंदर बोरुडे, विजय भालसिंग, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.