• Wed. Dec 11th, 2024

अकोला तालुक्यातील दुर्गम भागात एमएस-सिईटी परीक्षेचे केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांची सोय करावी

ByMirror

Aug 2, 2022

परीक्षा कालावधीत विशेष बसची व्यवस्था करण्याची आम आदमी पार्टीची मागणी

विद्यार्थ्यांना जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्र ठेवणे सोयीचे -प्रा. अशोक डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांचे एमएस-सिईटी परीक्षेचे नंबर अकोला तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या महाविद्यालयात आले असून, सदर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने परीक्षा कालावधीत शहरातून जादा बसेसची व्यवस्था करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने तारकपूर डेपोचे आगार व्यवस्थापक आघाव यांना देऊन चर्चा केली. आगार व्यवस्थापक आघाव यांनी एमएस-सिईटी परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी व्यवस्था करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले, शहर कार्याध्यक्ष भरत खाकाळ, संघटक प्रा. अशोक डोंगरे, मनोहर माने, दिलीप घुले, संपत मोरे, मारवाडे, रवी सातपुते, रोहन गायकवाड आदी उपस्थित होते.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एमएस-सिईटी परीक्षा 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. शहरासह इतर तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नंबर अकोले येथील महाविद्यालयात आलेले आहे. सदर परीक्षेचे ठिकाण अत्यंत लांब व दुर्गम भागात असल्याने तेथे जाण्याची पुरेशी सोय नाही. या परीक्षेसाठी बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या वतीने परीक्षा कालावधीत अकोले या ठिकाणी शहरातून जाण्यासाठी सकाळी 6 ते 7:30 यावेळेत व संध्याकाळी परतीसाठी विशेष बसची व्यवस्था करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांची सोयीच्या दृष्टीकोनाने त्यांचे परीक्षा केंद्र ठरविणे आवश्यक आहे. मात्र नगर जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या अकोला तालुक्यातील महाविद्यालयात अनेक विद्यार्थ्यांचे एमएस-सिईटी परीक्षेचे नंबर आले असून, यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. विद्यार्थ्यांना जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्र ठेवणे सोयीचे असून, यामुळे विद्यार्थी दडपणाखाली न राहात वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहचून परीक्षा देऊ शकतील. -प्रा. अशोक डोंगरे (शहर संघटक, आम आदमी पार्टी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *