शहरात रंगली राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धा
अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे पालकत्व स्विकारणार -नरेंद्र फिरोदिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात तीन दिवस अंधांची राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धा उत्साहात पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील अंध खेळाडूंनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र राज्य (मुंबई), राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र जिल्हा शाखा अहमदनगर, ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंड यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मिलिंद सामंत यांनी प्रथम, स्वप्नील शहा द्वितीय तर कार्तिक दमले यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
तीन दिवसात अनेक अंध खेळाडूंनी आपल्या खेळाचे कौशल्य पणाला लावत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अनेकानेक रोमांचक लढतीने बुध्दीबळ प्रेमींचा उत्साह वाढवला. अंधांची बुध्दीबळ स्पर्धा पाहण्यासाठी बुद्धिबळ प्रेमी व नगरकरांनी मोठी गर्दी केली होती. या स्पर्धेचा समारोप खेळाडूंच्या बक्षिस वितरणाने झाला. हेमंत काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नरेंद्र फिरोदिया, आकांक्षा पुनर्वसन केंद्राच्या सविता काळे, अविनाश चाबुकस्वार, सतीश शहा, प्रमोद भारुळे, संस्थेचे पदाधिकारी दत्तात्रय जाधव, ज्ञानोबा मरढे, प्रदीप लोंढे, गोरख दरंदले, संभाजी भोर, नितीन सोनार, श्रीकांत माचवे आदी उपस्थित होते.
नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, हारणे, जिंकण्यापेक्षा स्पर्धेत उतरणे महत्त्वाचे आहे. स्पर्धेत उतरल्याशिवाय आपल्यातील क्षमता ओळखता येत नाही. अंध व्यक्तींनी बुध्दीबळ स्पर्धेत आपले गुणांचे दाखवलेले कौशल्य कौतुकास्पद आहे. अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे पालकत्व स्विकारणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
प्रदीप लोंढे म्हणाले की, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ ही अंधांसाठी कार्य करणारी शिखर संस्था आहे. मागील 40 वर्षापासून संस्थेचे कार्य सुरु असून, अंधांना समाजात पुनर्वसन करण्याचे व अंध विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांना पायावर उभे करण्याचे प्रमुख कार्य करीत आहे. तसेच त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट करुन संस्थेचे माहिती दिली. सविता काळे यांनी अंध व्यक्तींच्या कला-गुणांना वाव मिळण्यासाठी घेण्यात आलेली स्पर्धा कौतुकास्पद असून, आकांक्षा पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक योगदान देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
संभाजी भोर यांनी अंधांचा रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या स्पर्धेसाठी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, सविता काळे, आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी, जिल्हा पोलीस दल यांचे आर्थिक सहयोग लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रदीप लोंढे, गोरख दरंदले, प्रसाद मोरे, सोमनाथ दरंदले, ऋषिकेश सोनार, ज्ञानेश्वरी माचवे, केतन दरंदले, राजेंद्र फलके, सुनिल बाचकर, सुभाष शिंदे यांनी परिश्रम घेतले.